सध्या वसंत ऋतू असल्याने सर्वत्र बहुतांश वनस्पती फुललेल्या अवस्थेत दिसून येतात. त्यामुळे या ऋतूत खाद्याची विपुल उपलब्धता असल्याने झाडांवर मधमाशी प्रचंड प्रमाणात नवीन पोळी तयार करताना आढळतात. विशेषतः पुरातन गड-किल्ले आणि लेणी अशा मनुष्याचा वावर कमी असलेल्या ठिकाणी मधमाश्या पोळी करताना दिसून येतात. या ठिकाणी पर्यटनासाठी जाताना कोणती विशेष काळजी घ्यावी याची माहिती या लेखातून दिली आहे.
‘प्राचीन गड-किल्ले-लेणी आणि मधमाशीचा वावर’
हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांचे खरेखुरे स्मारक म्हणजे महाराजांचे गड आणि किल्ले! महाराष्ट्र राज्याच्या वैभवशाली इतिहासाची साक्ष ठरणारी ही दिमाखदार वारसा स्थळे म्हणजे प्रत्येक मराठी माणसाची अस्मिता! मराठी माणसाला महाराजांच्या गड-किल्ल्यांचा रास्त अभिमान असल्याने या गड-किल्ल्यांना प्रत्यक्ष भेट देऊन त्यामागील इतिहासाची नीट माहिती घ्यावी, याकरता खास वेळ काढून विशेषतः सुट्टीच्या दिवशी मराठी माणसाची पाऊले या गड-किल्ल्यांकडे वळतात. तसेच पुरातन काळातील अप्रतिम शिल्पकलेची साक्ष ठरणाऱ्या लेण्यांना देखील सुट्टीत भेट देण्याकडे पर्यटकांचा कल दिसून येतो. अशा ऐतिहासिक गड-किल्ले-लेण्यांची प्रत्यक्ष सैर केल्याने साक्षात घडून गेलेला इतिहास तर माहिती होतोच; शिवाय उत्तम निसर्ग पर्यटन सुद्धा घडते. कारण साधारणतः गड-किल्ले-लेणी हे मानवी हस्तक्षेप शून्य अथवा अत्यल्प असलेल्या शहरापासून दूर अशा ठिकाणी असल्याने तिथे आणि त्या सभोवतालच्या आवारात कारवी, तेरडा, चवेणी, चवर, रानताग, भारंगी, माकडलिंबू, रानपोपटी, जांभळी मंजिरी, तोरण, घटबोर, बाभूळ, खैर, हिवर, पळस, पांगारा, कुसुंब यांसारख्या प्रदेशनिष्ठ वनस्पतींची रेलचेल बघावयास मिळते. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे तिथे उगवलेल्या या प्रदेशनिष्ठ म्हणजेच स्थानिक वनस्पतींमधील विविधता राखण्यात मोठे योगदान ‘मधमाशी’ ह्या कीटकाचे असते.
गड-किल्ले-लेणी हे मधमाश्यांचे अत्यंत आवडते वसतिस्थान का आहे याची कारणे पुढीलप्रमाणे : –
# गड-किल्ले-लेणी येथे मानवी हस्तक्षेप कमी प्रमाणात असतो; त्यामुळे हा अधिवास मधमाश्यांना वसाहत निर्माण करण्यासाठी सुरक्षित वाटतो.
# मधमाश्यांना हमखास खाद्य पुरवणाऱ्या स्थानिक सपुष्प वनस्पती गड-किल्ल्यांवर आणि आसपासच्या रानात उगवलेल्या आढळून येतात.
# गडावर गोड्या पाण्याचे टाके वा तळे असल्याने पाण्याची जवळजवळ वर्षभर उपलब्धता असते. इतर सजीवांसारखे मधमाश्यांना देखील पिण्यासाठी पाणी लागते. विशेषतः उन्हाळ्यात पोळ्याचे तापमान नियंत्रित ठेवण्यासाठी पाण्याची तीव्रतेने गरज भासते.
# गड-किल्ले-लेणी येथील उंच व भव्य पिंपळ, जांभूळ, वड असे पुराण वृक्ष, अंधाऱ्या गुहा, कडेकपारी अशा सर्व गोष्टी मधमाश्यांना पोळे बांधण्यास पूरक ठरतात.
निसर्ग संपदा – मधमाशी!
पर्यावरण रक्षण व संवर्धनासाठी मधमाश्या अत्यंत उपयुक्त ठरतात. मधमाश्यांचा मोठा नैसर्गिक अधिवास म्हणजे जंगल. जंगलात विविध सपुष्प वनस्पतींचे परागीकरण मधमाश्यांमार्फत घडून जंगलात जीवविविधता वाढीस लागते. यामुळे मधमाश्यां मार्फत जंगल राखण्यास व जंगलांचे संवर्धन होण्यास मदत होते.
कीटक जगतात सुमारे सत्तर टक्के परागीकरण एकट्या मधमाशी ह्या कीटकामार्फत होत असते. आपण दररोज ताटामधून जे अन्न खातो त्या अन्नातील एक तृतीयांश भाग हा फक्त मधमाश्यांच्यामार्फत घडलेल्या परागीकरणामुळे आपणास उपलब्ध होऊ शकलेला असतो. शेतातील शंभरपेक्षा अधिक पिके ही परागीकरण प्रक्रियेकरता पूर्णपणे मधमाश्यांवर अवलंबून असतात. जगातल्या एकूण वनस्पतींमधील ७३% वनस्पतींचे पर-परागीकरण फक्त मधमाश्या करत असतात. त्यामुळे मानवाच्या जगण्यासाठी मधमाश्या आवश्यक आहेत.
थोर शास्त्रज्ञ प्रोफेसर अल्बर्ट आइन्स्टाईन म्हणाले, “जर मधमाश्या या पृथ्वीतलावरून नाहीशा झाल्या तर मानवाचे आयुष्य फक्त चार वर्षे उरेल. मधमाश्या नष्ट झाल्यामुळे वनस्पतींचे परागण होणार नाही. त्याचा परिणाम म्हणून आणखी वनस्पती निर्माण होणार नाहीत आणि मग त्या वनस्पतींवर अवलंबून असलेले प्राणीसुद्धा निर्माण होणार नाहीत… शेवटी या सगळ्याचा परिणाम म्हणून माणसाचे अस्तित्वदेखील नष्ट होईल.” आता या त्यांच्या विधानाची प्रत्येकाने गंभीरपणे दखल घेणे ही काळाची गरज आहे.

भारतात नैसर्गिक अधिवासात सापडणाऱ्या मधमाश्या
मधमाशी हा समूह प्रिय कीटक असल्याने तो कीटक पोळे बांधून एकत्र वसाहत करून त्यात वास्तव्य करतो. राणी माशी त्या एका वसाहतीवर राज्य करते. मधमाश्यांमार्फत उत्तम परागीकरण घडून जैवविविधता वृद्धिंगत होण्यास मदत होते. तसेच पाळलेल्या मधमाश्यांच्या पेट्यांमधून मध, मेण, रोंगण, पराग असे उपयुक्त व आरोग्यदायी पदार्थ मानवास मिळतात. जैवविविधतेचे वरदान लाभलेल्या भारत देशामध्ये नैसर्गिक अधिवासात पुढीलप्रमाणे एपिस प्रजातीमधील एकूण तीन प्रकारच्या मधमाश्या सापडतात :-
(अ) दगडी उर्फ आग्या माशी (एपिस डॉरसाटा) आग्या माशी भारतात सर्वत्र म्हणजे अगदी आसेतूहिमाचल सापडते. ती आकाराने सर्वांत मोठी असून पूर्णपणे जंगली आहे. आग्या माश्या उघड्यावर प्रकाशात जंगलातील उंच वृक्षांवर, गड-किल्ले-लेणी या ठिकाणी, डोंगरावरील कड्यांवर भव्य पोळे करतात ज्यास आग्या मोहोळ म्हणून ओळखले जाते.
(ब) भारतीय सातेरी माशी (एपिस सिराना इंडिका) सातेरी माशी ही भारतभर आढळणारी मध्यम आकाराची माशी आहे. सातेरी मधमाश्या जंगलातील वृक्षांच्या ढोल्या, डोंगरातील अंधाऱ्या गुहा, कडेकपारींमधील अंधाऱ्या जागेत पोळे तयार करतात.
(क) फुलोरी माशी (एपिस फ्लोरिया) फुलोरी माश्या ह्या जंगले, शेते, बागा यांमधील फुलझाडांवर हमखास सापडतात. त्या एपिस प्रजातीमधील आकाराने सर्वांत लहान माश्या असून त्या उंच किंवा मध्यम आकाराच्या वृक्षांवर उघड्यावर पोळे बांधतात.
वर नमूद केलेल्या मधमाश्यांच्या प्रकारांमधील आग्या माशी आणि सातेरी माशी या वेळप्रसंगी पर्यटकांवर हल्ला चढवू शकतात. यापैकी एकाच वेळी अनेक आग्या माश्यांनी हल्ला चढवल्यास त्या आग्या माश्यांचा दंश जीवावर बेतू शकतो.
लेणी-गड-किल्ल्यांवरील पर्यटकांवर मधमाश्या का हल्ला करतात?
# काही कामकरी मधमाश्या ह्या खाद्याच्या शोधार्थ पोळ्याच्या भागात फिरत असतात, तर काही कामकरी मधमाश्या पोळ्याच्या भोवती संरक्षणार्थ फिरत असतात. ठराविक भागात कार्यरत असणाऱ्या या मधमाश्यांना मानवी हस्तक्षेप अजिबात आवडत नाही. माणूस त्यांच्या क्षेत्रात गेला की त्यांना पोळ्यातील राणी माशी व इतर माश्यांच्या जीवास त्याचा धोका वाटतो. त्यामुळे केवळ पोळ्याचे रक्षण करण्यासाठी या कामकरी माश्या त्या माणसावर हल्ला चढवतात.
# बरेचदा गड चढताना किंवा रॅपलिंग करत असताना पायाने माती किंवा दगड चुकून त्या वाटेकडेच्या कड्यावरील पोळ्यावर पडतो. अशाप्रकारे माती वा दगड पोळ्यावर पडल्यावर ते मोहोळ उठते आणि त्यातील माश्या चिडून वसाहतीमधील राणी व पिल्लांचे रक्षण करण्यासाठी ट्रेकरच्या अंगावर हल्ला चढवतात.
# अनियंत्रित तापमान वाढीमुळे उन्हाळ्यात मधमाश्यांना उष्मा बिलकुल सहन होत नाही. त्यामुळे अशा तापलेल्या वातावरणात मधमाश्या त्रस्त होऊन पोळ्या जवळ आलेल्या पर्यटकांवर हल्ला करू शकतात.
# मधमाशी हा संवेदनशील कीटक आहे. पर्यटकांनी तीव्र वासाचे अत्तर, परफ्युम, डिओ वापरलेले असल्यास मधमाश्यांना तो वास अजिबात सहन होत नाही. त्यामुळे त्या पर्यटकांवर मधमाश्या हल्ला चढवू शकतात. मधमाश्यांनी हल्ला करू नये म्हणून पर्यटकांनी कोणती खबरदारी घ्यावी?
# लेणी, किल्ले, गडावर फिरताना पर्यटकांनी पूर्ण शरीर झाकले जाईल असे निसर्गाशी मिळतीजुळती रंगसंगती असलेले कपडे, विंडचीटर जॅकेट, कोट परिधान करावेत. डोक्यावर टोपी, स्कार्फ, रुमाल किंवा कानटोपी घातलेली असावी. शक्यतो डोळ्यांवर गॉगल असावा.
# पर्यटकांनी तीव्र वासाची अत्तरे, परफ्युम, स्प्रे, डिओड्रंट यांचा वापर टाळावा. # पर्यटकांनी गडावर मधमाश्यांचे पोळे असलेल्या ठिकाणी आग पेटवून जाळ करू नये. सिगारेट ओढू नये. फटाके फोडू नयेत. त्या धुराने पोळ्यातील मधमाश्या कासावीस होत चेकाळून तेथील पर्यटकांवर हल्ला करतात.
# पोळे असलेल्या क्षेत्राच्या फार जवळून जाऊ नये. गोंगाट करत, गाणी म्हणत किंवा रेकॉर्डरवर मोठ्याने गाणी लावून तर अजिबात जाऊ नये.
# पर्यटकाने फर्स्ट एड बॉक्स जवळ ठेवावी.
# अवघड चढण असलेल्या गड-किल्ल्यावर एकट्याने जाऊ नये. बरोबर कोणीतरी जाणकार व्यक्ती असू द्यावी.
# ज्या लेणी, किल्ला, गडावर जायचे आहे त्या स्थानाच्या पायथ्याशी असलेल्या गावातील एखादी व्यक्ती, दुकान, हॉटेल, पोलीस चौकी, हॉस्पिटल यांचे मोबाईल नंबर जवळ नोंद करून ठेवावेत. मदतीची आवश्यकता वाटल्यास असे नोंद केलेले क्रमांक उपयोगी ठरतात.
लेणी, किल्ले वा गडावर भ्रमंती करणाऱ्या पर्यटकांवर मधमाश्यांनी हल्ला चढवल्यास त्या पर्यटकांनी काय उपाय करावेत?
# मधमाश्यांचे मोहोळ उठल्यास पर्यटकांनी आरडाओरडा न करता, हाताने वा काठीने माश्या न मारता तत्काळ शाल, चादर किंवा ओढणी असल्यास ती अंगावर लपेटून पोटावर निपचित पडावे.
# एखाद दुसरी मधमाशी चावली तर त्याचा बाऊ करू नये. कारण मधमाशीचा दंश हा औषधी असल्याने एखादी मधमाशी चावल्यास त्या दंशामुळे संधिवात, पक्षाघात असे रोग होत नाहीत.
# मधमाश्या अंगावर जिथे चावल्या असतील त्या जागी त्वरित माती चोळावी किंवा भोवताली असलेल्या रानतुळस, भांबुर्डी, दगडी पाला अथवा इतर औषधी वनस्पतींचा पाला चोळावा. मात्र उपद्रवी ठरणाऱ्या विषारी वनस्पतींचा पाला चोळू नये. पाला चोळल्यामुळे अंगाच्या त्या जागेवरील गंध नष्ट होऊन इतर मधमाश्या त्या पर्यटकावर हल्ला करणार नाहीत. कारण मधमाश्या स्वतःच्या पोळ्यातील माश्यांना फेरोमोनच्या गंधामुळे ओळखत असतात.
# Avil 25mg ह्या गोळ्या जवळ प्रथमोपचार पेटीमध्ये ठेवाव्यात. समजा खूप मधमाश्यांनी एकाच वेळी पर्यटकावर हल्ला चढवल्यास ही गोळी सेवन करावी.
# Apis Mellifica ह्या होमिओपॅथीक गोळ्या घ्याव्यात. त्याच नावाचे क्रीम शरीरावर डंख मारलेल्या जागी लावावे.
# वर नमूद केलेली औषधे, क्रीम पर्यटकाने प्रथमोपचार पेटीमध्ये आधीच समाविष्ट करून ठेवावीत म्हणजे आयत्या वेळी पंचाईत होत नाही.
# मधमाशी चावल्यास तिचा शरीरात अडकलेला काटा हाताने चोळू नये. चोळत बसल्याने काटा आणखी खोलवर जाऊन रुतून बसतो. तर तो काटा काडीने वरच्यावर काढून बाहेर टाकावा. मग त्यावर औषधी क्रीम / औषधी पाल्याचा रस / माती यांपैकी जे त्वरित उपलब्ध असेल ते चोळावे.
मधमाशी हा कीटक पर्यावरण रक्षणासाठी आणि मानवासाठी अत्यंत उपयुक्त असल्याने मधमाशीबद्दल मनात भीती बाळगल्यास या कीटकाबद्दल नकारात्मक चित्र निर्माण होते. असे चित्र तयार होणे चुकीचे आहे. त्याकरता सह्याद्रीतील दऱ्याखोऱ्यांमध्ये, डोंगर-गडांवर पर्यटन करणाऱ्या पर्यटकांनी, ट्रेकर्सनी मधमाश्यांबाबत सतर्क राहून वरील काळजी घेणे आवश्यक आहे. मधमाश्यांनी दंश केल्यास घाबरून न जाता तातडीने वर नमूद केलेले उपाय करणे गरजेचे आहे. बेसावध राहिल्यास पूर्ण मोहोळ उठून मधमाश्यांचा एकदम हल्ला होऊन त्या पर्यटकाच्या जीवावर बेतू शकते. त्यामुळे सह्याद्रीच्या खोऱ्यात ट्रेकिंग करत असताना किंवा निसर्गाचा आस्वाद घेत मनसोक्त भटकंती करत असताना अखंड सावधानता बाळगणे महत्त्वाचे आहे.
लेखिका – प्रिया फुलंब्रीकर * (लेखिका बी बास्केटच्या सदस्य आहेत.) ©बी बास्केट