भारतातील अंदमान, निकोबार, केरळ आणि कोकण म्हटले तर लांब किनारपट्टी आणि त्या समुद्र किनाऱ्यावर वाऱ्याने डोलणाऱ्या नारळाच्या झाडांची रांग असे मनोहर दृश्य डोळ्यांसमोर तरळते. नारळ ह्या निसर्गतः समुद्र किनाऱ्यावर उगवणाऱ्या वृक्षास ‘कल्पवृक्ष’ असे म्हटले जाते ते यथार्थच आहे. कारण नारळ हा वृक्ष आहे तसाच बहुगुणी!
नारळाच्या झाडाचा प्रत्येक भाग मानवास उपयुक्त ठरतो. सागर किनाऱ्यावर सापडणाऱ्या नारळ वृक्षाचे विविध उपयोग लक्षात घेऊन या वृक्षाची देशावर इतरत्र देखील ठिकठिकाणी लागवड होऊ लागली. कोकणातील नारळी-पोफळीच्या पारंपरिक वाड्या तर सर्वश्रुत आहेतच.
Cocos nucifera असे शास्त्रीय नाव असलेला माड म्हणजेच नारळ हा Arecaceae कुळातील वृक्ष भारतात जवळजवळ सर्वत्र आढळतो. भारतामध्ये नारळास श्रीफळ असे संबोधले जाते; परंतु नारळ हे मस्तकाचे प्रतीक असणारे शिरफळ आहे आणि बेलफळ हे लक्ष्मीचे प्रतीक असल्याने ते खरे श्रीफळ आहे. पण नारळास भारतामध्ये अत्यंत पवित्र समजले जाऊन धार्मिक तसेच सांस्कृतिक कार्यांमध्ये मान दिला जातो; त्यामुळे नारळ फळाचा श्रीफळ म्हणून उल्लेख केला जातो.

फोटो सौजन्य : अमित गोडसे
नारळाच्या झाडावर शेकडो नर फुले आणि तळाशी २०-३० मादी फुले अशी संरचना असलेला तुरा उगवतो. या नारळ फुलांचे परागीकरण वारा आणि मुख्यत्वे कीटकांमार्फत होते. परागीकरण करणाऱ्या कीटकांमध्ये प्रामुख्याने मधमाशी या कीटकाचा समावेश होतो. भारतात नैसर्गिक अधिवासात सापडणाऱ्या आग्या/दगडी माशी (Apis dorsata), सातेरी (Apis cerana indica), फुलोरी (Apis florea), डंखहीन माशी (Stingless Bee) आणि बंद पेटीत पाळण्याकरता युरोपातून आयात केलेली मेलिफेरा उर्फ युरोपीय माशी (Apis mellifera) अशा सर्व मधमाश्या नारळाच्या फुलांमधून मधुरस आणि पराग गोळा करतात. त्यावेळी त्यांच्यामार्फत परागण क्रिया घडून येते आणि कालांतराने मादी फुलांचे नारळ फळात रूपांतर होते. नारळाच्या झावळ्यांवर आग्या/दगडी माश्या आणि फुलोरी या दोन प्रकारच्या उघड्यावर पोळी बांधणाऱ्या मधमाश्यांनी पोळी केलेली दिसून येतात. नारळाचे झाड वर्षातून सुमारे आठ-नऊ वेळा फुलावर येते असे आढळते. त्यामुळे मधमाश्यांंना जवळजवळ वर्षभर नारळाच्या फुलांमधून मधुरस आणि पराग असे अन्न मिळत राहते. या कारणामुळे मधमाश्या नारळाच्या झाडावरील सर्वांत दणकट झावळी शोधून त्यावर पोळे बांधताना दिसून येतात. त्यांच्या वसाहती त्या पोळ्यांमध्ये सुखाने नांदतात आणि वसाहतींची वाढ जोमाने होत राहते. अगदीच वादळी पाऊस झाल्यास दगडी माश्या आणि फुलोरी माश्यांचे पोळे नारळाच्या झाडाखाली गळून पडलेले आढळते. अशा वेळी त्या पोळ्यातील वसाहत दुसरीकडे सुरक्षित जागा शोधून तिथे राणीमाशीसहित स्थलांतर करते. या दोन प्रकारच्या मधमाश्यां व्यतिरिक्त काही जुन्या नारळाच्या झाडांच्या बुंध्यातील खोलगट जागांमध्ये बहुसंख्य वेळा डंखहीन माश्या आणि अधिक खोल खड्डा तयार झाल्यास त्यात क्वचित सातेरी माश्या देखील पोळे बांधताना दिसून येतात. अशाप्रकारे नारळाचे झाड सर्व मधमाश्यांना विपुल खाद्य तर पुरवतेच; शिवाय या मधमाश्यांंना आसरा पण देते. मधमाश्यांशिवाय वटवाघळे देखील नारळाच्या झावळ्यांवर लटकून वास्तव्य करत असलेली दिसून येतात.

फोटो सौजन्य : आंतरजाल
कामकरी मधमाश्या फुलांमधून मधुरस गोळा करून तो त्यांच्या उदरात साठवून ठेवतात आणि फुलांमधून परागकण वेचून ते त्यांच्या पायांवरील परागपिशव्यांमध्ये गोळा करतात.
मधमाशीपालना करता पेटीमध्ये सातेरी आणि मेलिफेरा या एपिस प्रजातीमधील दोन भिन्न प्रकारच्या मधमाश्या पाळल्या जातात. पेटीमध्ये पाळलेल्या मधमाश्यांकडून मधपाळास मध, पराग, मेण, रोंगण (Propolis), राजान्न (Royal jelly) हे पदार्थ मिळतात. नारळ पुष्पांमधील परागामध्ये भरपूर प्रमाणात प्रथिने आणि जीवनसत्त्वे आढळून येतात. नारळाची लागवड केलेल्या जागेत मधमाश्यांच्या पेट्या ठेवल्यास मधपाळास त्या पेट्यांतील पराग सापळ्या (pollen trap) मधून नारळाच्या फुलांतील पराग मिळू शकतात. त्यास बाजारात मागणी असल्याने त्यांची विक्री केल्यास मधपाळ उत्तम नफा मिळवू शकतो. मधमाश्यांंना नारळ फुलांपासून अन्न मिळते व झाडावर आसरा मिळतो; तर मधमाश्या परपरागीभवन ही फार मोठी सेवा पुरवतात आणि त्यामुळे नारळाच्या फळांची गुणवत्ता तर सुधारतेच; शिवाय नारळ फळांच्या संख्येत वाढ झालेली दिसून येते. मधमाशीपालनामुळे एकूण पंचवीस ते तीस टक्के नारळाच्या उत्पादनात वृद्धी झालेली दिसून येते. अशाप्रकारे नारळ आणि मधमाशी यांचे परस्परांना हितकारक ठरणारे अद्भुत नाते आहे. याचा फायदा मधपाळ तसेच नारळाची लागवड करणारे शेतकरी अशा दोघांनाही होतो. नारळाची लागवड केलेला शेतकरी हाच मधपाळ असल्यास त्यास दुहेरी लाभ मिळतो.
खरोखरच नारळ हा कल्पवृक्ष बहुगुणी असून या वृक्षाची योग्य अधिवास निवडून तिथे अधिकाधिक प्रमाणात योजनाबद्ध पद्धतीने लागवड करणे आणि तिथे शास्त्रशुद्ध मधमाशीपालन करणे हे सर्वांच्या हिताचे आहे.
लेखिका – प्रिया माधव फुलंब्रीकर
(लेखिका मधमाशी अभ्यासक असून बी बास्केट या मधमाशी संवर्धन करणाऱ्या संस्थेच्या सदस्य व कार्यकर्ता आहेत.)
लेख ‘वनराई’ मासिकात पूर्वप्रकाशित