मानवाच्या उत्क्रांतीच्या कितीतरी आधी पृथ्वीवर जीवसृष्टी अस्तित्वात आली तेव्हा सपुष्प वनस्पतींच्या निर्मितीबरोबर त्यांचे परागीकरण करणारे जीवदेखील उत्पन्न झाले. त्यातीलच एक परागण करणारा महत्वाचा कीटक म्हणजे ‘मधमाशी’ होय. मधमाशी हा कीटक त्यापासून आपल्याला प्रिय असणारा ‘मध’ मिळतो म्हणून सर्वाधिक परिचित आहे.
मधाला पृथ्वीतलावरील अमृत असे संबोधले जाते आणि हे वर्णन यथार्थच आहे कारण नैसर्गिक मध (Organic raw honey) हा अत्यंत स्वादिष्ट असून ‘सुरक्षित अन्न व औषध’ म्हणून श्रेष्ठ आहे.
शुद्ध मधाचा आयुर्वेदाने औषध म्हणून गौरव केलेला असून आयुर्वेदशास्त्रात मध हा तुरट (astringent) चवीचा मानला जातो. मधामध्ये जीवनसत्त्वे ए, बी, सी, लोह, कॅल्शियम, सोडियम फॉस्फरस, आयोडिन असल्यामुळे मध हा आपल्या शरीरात रोगांशी प्रतिकार करण्याची शक्ती वृद्धिंगत करतो. मध हा नुसता खाल्ला तरी औषधी आहे शिवाय आयुर्वेद वैद्य बरीच आयुर्वेदिक औषधे नैसर्गिक मधात मिसळून घ्यायला रुग्णांना सांगतात. याचे कारण म्हणजे मधात जे पदार्थ मिसळले जातात त्या त्या पदार्थांचे मुलभूत गुण वाढवण्याचा असामान्य गुणधर्म मधात निसर्गतः आहे.म्हणून मधाबरोबर योग्य मात्रेत आयुर्वेदिक औषध घेतल्यास त्याचा रुग्णास लवकर गुण येण्यास मदत होते. भारत ही आयुर्वेदाची जन्म व कर्मभूमी असल्यामुळे भारतात मधाकडे औषध म्हणून बघण्याचा दृष्टिकोन जास्त प्रमाणात दिसून येतो तर इतर देशांमध्ये मधाचा वापर अलौकिक माधुर्य असलेले आरोग्यदायी अन्न म्हणून केला जातो. इतर देशात मध हा ब्रेड स्प्रेड, जॅम, केक, मिठाई, चॉकलेट, भाज्यांचे व फळांचे सॅलड्स इत्यादींमध्ये वापरला जातो. याशिवाय मध हा अन्न टिकवणारा (natural preservative) असल्यामुळे त्याचा जगभर अन्नामध्ये उपयोग केला जातो.
सुरक्षित अन्न व औषध म्हणून मान्यता पावलेला नैसर्गिक मध म्हणजे मधावर कोणतीही प्रक्रिया न केलेला शुद्ध मध. असा शुद्ध मध शास्त्रीय अहिंसक पद्धतीनुसार मधमाशांना न मारता पोळ्यातून काढलेला असावा. अशा पद्धतीत पोळ्यातील फक्त मध साठवलेल्या भागातून जितका हवा असेल तितकाच मधाचा कांदा कापून घेतला जातो. उरलेले पोळे जसेच्या तसे ठेवले जाते. या पद्धतीत पोळ्यातील मधमाशा, पिल्ले व अंडी यांना कोणताही धोका पोहोचला जात नाही.याउलट अशास्त्रीय पद्धतीमध्ये संपूर्ण पोळे पिळून मध काढला जातो. यामध्ये पोळ्यातील सर्व मधमाशा, पिल्ले व अंडी मारली जातात. अगदी राणी माशीदेखील मारली जाते. अशा पद्धतीमुळे मधमाशांच्या वसाहतीच नष्ट होतात. ही पद्धत अज्ञानापोटी जंगलातील आदिवासी अवलंबतात त्यामुळे जंगलातील जैववैविध्याची हानी होण्याचा धोका संभवतो. याकरता आदिवासी, शेतकरी, व्यावसायिक मधपाळ होण्याची इच्छा असलेल्या कोणत्याही व्यक्तीने मधमाशीपालन तंत्राचे शास्त्रशुद्ध प्रशिक्षण घेणे गरजेचे आहे. तसेच मधमाशी तज्ज्ञांनी सर्वत्र मधमाशी विषयक जाणीव जागृती निर्माण करण्याची गरज आहे.
तसेच मोठ्या प्रमाणात सर्गिक मध बाजारात आणण्यापूर्वी त्या मधाचे प्रयोगशाळेत यथोचित परीक्षण केले जाणे आवश्यक आहे. अनेक चाचण्या व कसोट्यांतून पात्र ठरलेला मध बाजारात आणल्यास त्यास खऱ्या अर्थाने सुरक्षित म्हणता येईल. निसर्गात ठराविक ऋतुनुसार झाडांना बहर येत असतो व त्यामुळे नैसर्गिक मधाचे उत्पादनदेखील ऋतुनुसार होत असते. त्यामुळे नैसर्गिक मधात कायम विविधता आढळून येते. या कारणास्तव दरवेळी प्रत्येक ऋतुमधील फुलोऱ्यानुसार उपलब्ध झालेला मध हा वेगवेगळ्या रंगाचा, चवीचा, गंधाचा, स्वादाचा व घनतेचा (दाट/पातळ) असतो. प्रयोगशाळेत चाचणी केल्यानंतर मध हा मधमाशांनी एकाच प्रकारच्या फुलोऱ्यापासून (unifloral) का अनेक प्रकारच्या फुलोऱ्यापासून (multifloral) तयार केला आहे हे समजून येऊन त्या त्याप्रमाणे तो मध ओळखला जातो.
मधमाशांमार्फत परागीकरण उत्तम घडून उत्कृष्ट प्रतीची फळे, पीके मिळतात म्हणून मधमशीपालन हा शेतकऱ्यांकरता नफा देणारा जोडधंदा ठरू शकतो. शेतांमध्ये मधुपेट्या ठेवल्यामुळे उत्तम गुणवत्तेचे भरपूर पीक मिळते; शिवाय शेतकऱ्यांना वर्षातून कमीतकमी दोनवेळा मधूपेटीतील माशांनी तयार केलेला अप्रतिम दर्जाचा शुद्ध मध मिळू शकतो. हा मध विकून शेतकऱ्यांना आर्थिक लाभ मिळवता येतो. तसेच पेटीतील पोळ्यांमधून मिळणारे पराग, मेण, प्रपोलिस, राजान्न असे मधमाशीजन्य पदार्थ शेतकरी विकू शकतो. कर्जाच्या बोजामुळे होत असलेल्या शेतकऱ्यांच्या आत्महत्येसारख्या दुर्दैवी घटना टाळण्याकरता शास्त्रशुद्ध मधमशीपालनासारखा जोडधंदा हा सुद्धा एक प्रभावी उपाय ठरू शकतो. मधमाशीपालन करण्याकरता शेतात व भोवताली मधमाशांकरता पूरक वातावरण असणे गरजेचे असते. शेतात लागवड केलेली योग्य पीके असणे व शेत असलेल्या भागात आवश्यक फुलझाडे असणे हे पेटीतील मधमाशा जिवंत ठेवण्यास, त्यांची वसाहत सक्षम राहण्यास महत्त्वाचे ठरते. तसेच मधमाशी हा संवेदनशील कीटक असल्यामुळे त्यास तीव्र व घातक रसायने मारक ठरतात. अशी रसायने असलेली कीटकनाशके, कीडनाशके, तणनाशके जर शेतकऱ्यांनी शेतात फवारली तर त्यांचा मधमाशांवर तत्काळ विपरीत परिणाम होऊन त्या मृत्युमुखी पडतात. त्यामुळे अशी रसायनांची फवारणी करताना मधुपेट्या तिथून हलवून दुसरीकडे सुरक्षित जागी ठेवणे किंवा फवारणी करत असताना प्रत्येक मधुपेटीचे दार बंद करणे अशी शेतकऱ्याने उपाययोजना करून मधमाशांची काळजी घेणे आवश्यक असते. परंतु शेतकरी जर सेंद्रिय किंवा नैसर्गिक पद्धतीची शेती करत असेल तर मधमाशांकरता अशी कोणतीही काळजी घ्यायची आवश्यकताच नसते. अशा सेंद्रिय किंवा निसर्ग पद्धतीच्या शेतात उत्तम मधमाशीपालन करता येते. मधमाशीपालनामुळे जैवविविधता देखील वाढलेली आढळून येते. अशाप्रकारे मानवास अनेक तऱ्हेने उपयोगी पडणारा मधमाशी हा बहुगुणी कीटक वाचवणे हे प्रत्येकाचे कर्तव्यच आहे.
कोणतीही प्रक्रिया न केलेला नैसर्गिक मध हा हवेतील तापमान कमी होऊन गारवा वाढल्यास कणीदार होऊ शकतो व असे झाल्यास मधाची बाटली सुर्यप्रकाशात ठेवणे किंवा गरम पाण्यात ठेवणे यासारखे उपाय करता येतात. मध जरी कणीदार झाला तरी त्याच्या औषधी गुणधर्मात व दर्जात कोणताही फरक पडत नाही. मध हा गुणकारी असल्यामुळे लोकं शुद्ध मध म्हटला की तो डोळे झाकून हमखास विकत घेतात. ही मानसिकता ओळखून शुद्ध मध ह्या नावाखाली फसवणाऱ्या भोंदू लोकांची प्रचंड संख्या समाजात असल्यामुळे मध हा नेहमी खात्रीच्या मधपाळांकडून घ्यावा किंवा विश्वासार्ह व मान्यताप्राप्त कंपनीचा घ्यावा. नुकताच ताजा मध काढलेला आहे असे सांगत बादलीत मध घेऊन दारावर येणारे विक्रेते यांच्याकडून मध कदापि विकत घेऊ नये. त्यात काकवी टाकून विकल्याच्या अनेक घटना सिद्ध झालेल्या आहेत. त्यामुळे विशेष काळजी घेत जागरूक राहणे प्रत्येकाच्या हिताचे आहे. तसेच काही कंपन्या अति प्रमाणात प्रक्रिया करून सत्व कमी झालेला मध, भेसळयुक्त मध, कृत्रिम स्वाद घातलेला मध, अँटिबायोटिक्सचा वापर केलेला मध बाजारात सर्रास विकत असतात. असा मध सेवन करणे प्रकृतीस अपायकारक ठरते. अशा कंपन्यांच्या जाहिरातबाजीला, भूलथापांना बळी न पडता सजग ग्राहक बनणे अत्यावश्यक आहे. असा खोटा मध बाजारात आणला जातो याचे एक मुख्य कारण म्हणजे दिवसेंदिवस मधमाशांची घटत होत जाणारी संख्या. अलिकडे वाढती लोकसंख्या, झपाट्याने होत असलेले शहरीकरण, चोरटी वृक्षतोड, इत्यादी कारणांमुळे जंगलांचे क्षेत्र कमी कमी होत चालले आहे. जंगलातील पोळी वर नमूद केलेल्या अशास्त्रीय पद्धतीने पिळून काढून ती आदिवासींकडून नष्ट केली जातात. ग्रामीण भागातील व शहरातील पोळी मधमाशांविषयी वाटणारी भीती व अज्ञानापोटी आग लावून अथवा पेस्ट कंट्रोलसारखा घातक उपाय करून नष्ट केली जातात. मधास मागणी जास्त व मधमाशांच्या कमी होत चाललेल्या संख्येमुळे मधाचा पुरवठा कमी अशा तफावतीमुळे खोटा मध बेमालूमपणे बाजारात आणण्याचे प्रमाण वाढत चालले आहे.
या सर्व गोष्टी लक्षात ठेवून विवेकबुद्धीचा वापर केल्यास सुरक्षित मध नक्कीच ओळखता येऊन स्वतःचे स्वास्थ्य राखणे शक्य होईल.
समर्थ श्री रामदास स्वामींनी म्हटले आहेच,
“पर्णाळी पाहोन उचले,
जीवसृष्टी विवेके चाले”
म्हणजे झाडाच्या पानावरील अळी यासारखा क्षुद्र कीटकदेखील आधार बघूनच पुढचे पाऊल टाकतो मग बुद्धिवान माणसाने विवेकाने विचारपूर्वक कर्मे करणे सर्वार्थाने कल्याणकारक आहे. तर मग आपण पण सजग नागरिक बनत सुरक्षित व असुरक्षित अन्न यातील भेदाभेद जाणून घेऊन विचारपूर्वक कृती करूया. यातच सर्वांचे भले आहे.
लेखिका :- प्रिया फुलंब्रीकर
(हा लेख ‘वनराई’ मासिकाच्या डिसेंबर २०१७ च्या अंकात प्रकाशित झालेला आहे.)