My Cart
0.00
Blog

आठवणीतला शेवगा

पुण्यासारख्या गजबजलेल्या शहरात सदाशिव पेठेत वृक्षवल्लींच्या सान्निध्यात माझे बालपण गेले. तेव्हापासून त्या हिरवाईने लावलेली माया अबाधित असून आज मानवनिर्मित प्रदूषणामुळे गांजलेल्या निसर्गासाठी थोडंफार करण्याची ऊर्जा देत आहे.

    एखाद्या कादंबरीत जशी पात्रं असतात तसे माझ्या अदृष्य स्वरूपातील निसर्ग पुस्तकात झाडेझुडुपे, लतावेली, इवलीशी क्षुपे, प्राणीपक्षी, दगड-धोंडे, विहीरी-हौद अशी अनेक बहुरंगी बहुढंगी पात्रं आहेत. त्यातील काही कायमची निघून गेलेली आहेत तर काही अजून साथ देत आहेत. त्या पुस्तकातीलच एक असलेला हा शेवगा ज्याची भेट या आठवणीमधून मला परत घडली आहे.

    मी जेव्हा बाजारात शेवग्याच्या शेंगा पाहते तेव्हा मला आठवतो आमच्या घरातील मागच्या अंगणातला शेवगा!  अंगणातले ते शेवग्याचे झाड माझ्या निसर्गप्रेमी आजीने खास नारळीपोफळीच्या रोपांबरोबर कोकणातून आणले होते व स्वतःच्या हाताने लावून मायेने जोपासलेले होते. परसात अगदी टोकाला म्हणजे आमचे घर व शेजारचे घर यांच्या अगदी बरोबर मधोमध लावलेले असे ते झाड होते.  आमच्या बागेत हा शेवगा तसेच नारळ, सुपारी, सोनचाफा, लाल चाफा, पेरू, डाळींब, सीताफळ, आवळा, आंबा, लिंबू, चिक्कू, केळे, गुलाब, जास्वंद, रातराणी, पारिजातक, तगर, जाई-जुई, मधुमालती, कृष्णकमळ, बदकवेल, घोसाळे, मायाळू, अबोली, कोरांटी, कर्दळी, गुलमेंदी, लिली, फडया निवडुंग अशी अनेक झाडे-झुडुपे, लतावेली होत्या. आमचे शेवग्याचे झाड इतके उंच वाढले होते की ते शेजारील घराच्या छपरावर गेले होते. तेव्हा मोठमोठ्या इमारती नसल्यामुळे आमच्या गल्लीतील घरे साधारण एकमजलीच होती. आमचा शेवगा वर्षभर फुलायचा त्यामुळे त्यावर कायम शेंगा धरलेल्या असायच्या. बरं, या झाडाच्या शेंगा म्हणाल तर अगदी गोड गराने ठासून भरलेल्या. शेंगा पूर्ण वाढल्यावर आमचा कान्हू गडी दर महिन्याला बांबूच्या मोठ्या आकडीने त्या काढायचा. त्या काळी गृहिणीधर्म व शेजारधर्म उत्तम पाळला जायचा. शेंगा झाडावरून काढल्यावर आमची आजी त्या शेंगा दोन्ही बाजूच्या शेजारी समान प्रमाणात वाटायची. तसेच आमच्या बागेतील झाडांवरून नारळ, सुपाऱ्या, सोनचाफ्याची फुले, कैऱ्या, केळी, डाळींब उतरवल्यावर आजी ते निसर्ग धन काही स्वतःच्या परिवाराकरिता राखून ठेवून उरलेले शेजारीपाजारी व घरातील नोकरवर्गात मुक्त हस्ते वाटून टाकायची. तिची हीच परंपरा तिच्या सुनेने म्हणजे आमच्या आईने पुढे चालवली. आम्हालादेखील गल्लीतील लोकांकडून त्यांच्या अंगणातला पेरू, जांभळे, केळी, कैऱ्या असा मेवा दरवर्षी मिळायचा.

    अंगणातल्या शेवग्याच्या शेंगा वापरून घरी वरचेवर पिठले, कढी व आमटी केली जायची. तसेच त्या सांबारात आवर्जून घातल्या जायच्या. उन्हाळ्यात घरी भरपूर पाहुणे असताना त्यांचे वैशिष्ट्यपूर्ण लोणचे बनवले जायचे. हे लोणचे वर्षातून एकदाच केले जायचे म्हणून त्याचे सर्वांना कौतुक असायचे. शेवग्याच्या पानांचा व सालीचा उपयोग घरगुती औषधात केला जायचा. पोट साफ होत नसल्यास पानांची कोरडी भाजी केली जायची किंवा पाने डाळीत टाकून त्याचे शिजवून वरण केले जायचे. मला आठवते लहानपणी माझ्या टॉन्सिल्सना सूज आली होती तेव्हा आई रोज शेवग्याची साल उगाळून त्याचा लेप त्या सुजेवर लावायची. गल्लीतील आम्हा लहान मुलांचा अड्डा मागील अंगणात कायम या शेवग्याखाली जमायचा. शेवग्याच्या झाडाच्या खोडातून गोंद स्त्रवायचा व आम्ही मुले तो चाखून बघायचो. आम्ही शेवग्याचा गोंद हिंगाच्या जुन्या रिकाम्या डबीत भरून ठेवायचो व कागदावर काढून कातरलेली चित्रं, पोस्टाची पाकिटे, तिकिटे वगैरे चिकटवण्याकरिता तो वापरायचो.

    परसातला हा शेवगा कायमच फुललेला असल्यामुळे त्याच्या फुलांवर लहानशा माश्या घोंघावत असायच्या. त्यांची पोळीदेखील कधी शेवगा तर कधी आंब्याच्या झाडावर लागलेली दिसून यायची. अलीकडे मधमाश्यांचा अभ्यास करताना समजले की त्या फुलोरी मधमाश्या होत्या. आमच्या बागेत अनेक प्रकारचे पक्षी, कीटक आणि वाघुळे, खारी, सरडे, मुंगूस, मांजर असे प्राणी यायचे व त्यातील काही मुक्कामालाच असायचे. कावळ्यांची काही घरटी शेवग्याच्या वरील भागात दिसायची. तसेच संध्याकाळी एक गव्हाणी घुबड येऊन या शेवग्याच्या टोकाकडील फांदीवर बसून भेदक नजरेने टेहाळणी करताना दिसायचे. रात्रीच्या काळोखात मधूनच त्याचा घुत्कार ऐकू यायचा आणि छातीत अगदी धस्स व्हायचे. उन्हाळ्याच्या सुट्टीत रात्रीचे जेवण झाल्यावर अंगणात दिवा लावून शेवग्याखाली सर्व बच्चेकंपनी जमा व्हायची तेव्हा भुतांच्या गोष्टींना रंग चढायला असे आजूबाजूचे वातावरण पूरक ठरायचे. त्यात भर म्हणून मागील अंगणात विहीर होती. त्यामध्ये रात्रीच्या वेळी डोकवायचे नाही अशी मोठ्यांनी आम्हाला तंबी दिलेली होती. अर्थात विहिर झाकण लावून बंदिस्त केलेली नसल्यामुळे आमची सुरक्षितता हा विहिरीत रात्री डोकावू नका असे सांगण्यामागे विचार होता हे आता समजते पण तेव्हा ही जाणीव नसल्यामुळे त्या विहिरीचा संबंध रात्री गोष्टीतील भुताखेतांशी जोडला जायचा. कधीतरी धीर करून आमच्यातील काही टारगट मुले गुडूप अंधार पडल्यावर त्या विहिरीत हळूच डोकावून बघायची. त्यांची चाहुल लागताच विहिरीतील पाण्यावर आलेली एखादी मासोळी किंवा बेडूक पाण्यात सूळकन् डुबकी घ्यायचा व त्या डुबुsकss आवाजाने आमची खात्री पटायची की इथे नक्की कोणाचा तरी वावर आहे. मग दुसऱ्या रात्री आमच्या कल्पनाशक्तीला अधिक बहर यायचा व शेवग्याखालच्या बैठकीत एक नवी भूतकथा जन्मास यायची. उन्हाळ्याच्या सुट्टीत घरी पाहुणे म्हणून आलेल्या आमच्याहून लहान वयाच्या आत्ये-मामे-चुलत भावंडांना असे घाबरवायला मजा यायची. मागच्या अंगणात मध्यभागी एक तुळशीवृंदावन होते. त्यावर अतिशय सुंदर कोरीवकाम केलेली गोपाळकृष्णाची मूर्ती होती व त्या तुळशीवृंदावनात एका बाजूला दिवा ठेवण्यासाठी देवडी केलेली होती. आम्ही मुले दररोज बागेतील फुलं वाहून त्या गोपाळकृष्णाची व तुळशीची पूजा करायचो. तसेच अंगणात मातीतून वर डोके काढलेले दोन काळेशार भव्य दगड एकमेकाशेजारी पहुडलेले होते. त्या दगडांना आम्ही मुले म्हसोबा मानायचो व त्यांची मनोभावे पूजा करायचो. त्या दगडांवर खेळताना पाय टाकला जाणार नाही याची खबरदारी घ्यायचो व कधी चुकून पाय त्यावर पडलाच तर लगेच नमस्कार करून त्या देवाची क्षमा मागायचो आणि त्याची उदबत्ती ओवाळून पूजा करायचो. तर अशी आमची घराभोवतीची चौफेर बाग होती व बागेतील प्रत्येक वृक्ष आणि प्राणी-पक्ष्यांशी अगदी निर्जीव दगडांशीदेखील आमचे जिव्हाळ्याचे भावनिक नाते जुळलेले होते.

    आमच्या बागेचे सुख सन १९९० पर्यंत आम्ही पुरेपूर उपभोगले आणि एके दिवशी शेजारच्या घरांवर आळीपाळीने कुदळ पडली. आमच्या घराच्या दोन्ही बाजूची टुमदार घरे जमीनदोस्त केली गेली व त्याजागी उंच इमारती बांधल्या गेल्या. एक इंचदेखील जागा न सोडता बांधकाम केल्यामुळे आमच्या घराच्या दोन्ही बाजूकडील बाग बेचिराख झाली त्यात आमचा हा लाडका शेवगापण गेला.  लहानपणापासूनचे भरभरून प्रेम देणारे हे हिरवे दोस्त असे डोळ्यांसमोर एकामागोमाग एक नष्ट झाल्यामुळे मनास अतीव दुःख झाले. आता पूर्वीच्या बागेतील चार-पाच वृक्षच तेवढे तग धरून शिल्लक राहिले आहेत. त्यांचे सगेसोयरे गेल्याने ते बिचारे पोरके होऊन अंग चोरून जगत असल्यासारखे वाटतात. शेवग्याच्या जागी उंच भिंत उभी आहे. आता पूर्वीसारखा शेजार पण राहिला नाही. स्नेहभाव जरी कायम असला तरी जणू फाळणी झाल्याप्रमाणे माणसे दुरावली गेली आहेत. शेवटी काय तर ‘कालाय तस्मै नमः’  म्हणायचे व उगवत्या दिवसाला सामोरे जायचे. आता अंगणात थोडीच जागा शिल्लक आहे तरी मागील परसात पूर्वीच्या शेवग्याची आठवण ठेवून परत शेवगा लावला आहे. निसर्गाबद्दल सजगता यायला गतकाळात अनुभवलेला हा घरातीलच समृद्ध हिरवा पसारा व त्याने जोडलेली माया मुख्यत्वे कारणीभूत आहे.

    Moringaceae कुळातील Moringa म्हणजेच शेवगा हा एकमेव प्रकार असून त्याच्या भारतात विविध प्रजाती आढळतात.  आशिया व आफ्रिका खंड हे शेवग्याचे मूळ उगमस्थान आहे. आपण भारतामध्ये अन्न म्हणून वापर करतो त्या शेवग्याच्या प्रजातीचे वनस्पतीशास्त्रीय नाव Moringa oleifera असे आहे.  हे जलद गतीने वाढणारे पानगळीचे वृक्ष भारतात हिमालयाच्या पायथ्याशी नैसर्गिकरित्या उगवताना दिसून येतात अशी शास्त्रीय नोंद आहे. मात्र भारतात इतरत्र ठिकाणी शेवगा वर्गातील ही प्रजाती मुद्दामहून लागवड करून लावलेली आढळून येते. मोरिंगा (Moringa) हा शब्द मुरुंगाई या तमिळ शब्दापासून निर्माण झालेला असून त्याचा अर्थ drumstick किंवा twisted pod असा आहे तर oleifera हा शब्द oleum (oil) आणि ferre (to bear) या दोन लॅटिन शब्दांचा मिळून बनलेला संधी असून त्याचा अर्थ तेल देणारा (oil bearing) असा आहे. अलिकडे भारतात शेवग्यावर विपुल संशोधन केले गेल्यामुळे शेवग्याचे महात्म्य सर्वत्र सिद्ध झाले आहे. शेवग्याच्या शेंगा, फुले व पाने हे भाग अन्न म्हणून सेवन केले जातात. शेवग्याच्या पानांत भरपूर प्रमाणात A, B, C, K जीवनसत्वे, लोह, कॅल्शियम व प्रोटीन असल्यामुळे त्याची पाने ताजी खाल्ली जातात तसेच वाळवून पण सेवन केली जातात. त्या वाळवलेल्या पानांची पावडर करून त्याची औषध म्हणून विक्री केली जाते. ही पानांची पावडर रोज मधात मिसळून सेवन केल्यास त्याचा आरोग्यवर अधिक चांगला परिणाम दिसून येतो. अशा प्रकारे शेवग्याची पाने अत्यंत पौष्टिक असून भारतातील आदिवासी या पानांची भाजी जेवणात अगत्याने समाविष्ट करतात. शेवग्याचे मूळदेखील औषधी असून जंतूनाशक आहे. तसेच शेवग्याच्या शेंगेतील बिया ह्या पाणी शुद्ध करण्यासाठी वापरल्या जातात. तसेच बियांपासून तेल काढले जाते. हे तेल खाद्य तेल म्हणून वापरले जाते. या तेलाचा केस आणि त्वचेवर लावण्यासाठी उपयोग केला जातो. तसेच या तेलाचा सौन्दर्य प्रसाधनांमध्ये आधारभूत घटक म्हणून वापर केला जातो. शेवग्याची साल उगाळून शरीराच्या सुज आलेल्या भागावर लावतात.

    शेवगा हे झाड अगदी मुरबाड जमिनीत देखील कमी पाण्यावर किंवा त्या प्रदेशात पडणाऱ्या नुसत्या पावसाच्या पाण्यावर तग धरू शकते व चांगले वाढू शकते.  उत्तम हवामान व पर्जन्यमान असलेल्या ठिकाणी शेवगा हा साधारणपणे वर्षातून कमीतकमी दोन वेळा तरी फुलतो किंवा अगदी बारमाहीदेखील फुलावर असतो. यामुळे शेवग्याची शेतामध्ये किंवा शेताच्या बांधावर भरपूर लागवड करून तिथे मधुपेट्या ठेवणे हे मधपाळास अत्यंत लाभदायी ठरते. शेवग्याच्या फुलांना विशिष्ट गंध असतो. विशेषतः सकाळच्या वेळी शेवग्याच्या झाडाजवळ गेल्यास हा गंध प्रकर्षाने जाणवतो. मधुपेटीतील पाळीव मधमाश्यांना शेवग्याच्या फुलांमधून भरपूर मकरंद व पराग मिळतात. मधपाळास पेटीतील मधमाश्यांनी शेवग्यापासून तयार केलेला उत्कृष्ट प्रतीचा नैसर्गिक व औषधी मध मिळू शकतो. त्यामुळे घरातील परसबागेत किंवा गच्चीवरील बागेत शेवगा लावून हौशी मधपाळ तिथे मधुपेट्या ठेवू शकतो व उत्तमरित्या शास्त्रीय मधमाशीपालन करू शकतो. तसेच भारतात शेतकऱ्यांनी जर शेतामध्ये योग्य जागी अधिकाधिक शेवगा लागवड करून तिथे शास्त्रीय पद्धतीने मधमाशीपालन केल्यास त्यांना शेवगा व मधमाशीपालन या दोहोंमधून आर्थिक लाभ मिळवता येतो. पेटीतील पाळीव मधमाश्यांनी तयार केलेला मध, मेण, इत्यादी पदार्थांच्या विक्रीतून शेतकरी फायदा करून घेऊ शकतो. तसेच शेवग्याची पाने, शेंगा विकून शेतकऱ्यास चांगला आर्थिक लाभ होऊ शकतो. शिवाय शेतकरी शेवग्याच्या शेंगांतील बियांपासून किंवा छाट कलम करून शेवग्याची रोपे तयार करू शकतात व त्या विक्रीपासून उत्पन्न मिळवू शकतात. अशा प्रकारे शेतकऱ्यांना शेवगा ही आशेचा किरण दाखवत संजीवनी मिळवून देणारी वनस्पती ठरू शकते.

    शेवगा हा आपण अंगणातील परसबागेत लावू शकतो. घरास अंगण नसून गच्ची असेल तर गच्चीत मोठ्या ड्रममध्ये शेवगा लावू शकतो. या लागवडीचा फायदा संपूर्ण कुटुंबाला होतो. अशा प्रकारे शेतात, अंगणातील परसबागेत, गच्चीवरील बागेत, गृहसंस्थेतील मोकळ्या आवारात प्रत्येक भाग उपयुक्त असणाऱ्या सर्वांगसुंदर व बहुगुणी शेवग्याच्या लागवडीस प्राधान्य देणे सर्वांच्या हिताचे आहे.

लेखिका : प्रिया फ़ुलंब्रीकर

Team Bee Basket

Founder of Green Birds Initiative

Leave your thought