भारतामध्ये नैसर्गिक अधिवासात सापडणाऱ्या सर्व मधमाश्यांमध्ये तसेच मधमाशीपालनाकरिता वापरण्यात येणाऱ्या सर्व मधमाश्यांच्या प्रकारांमध्ये पोयाच्या माश्या म्हणजेच स्टिंगलेस बी किंवा दंशहीन मधमाश्या ह्या परागीभवनाकरिता अत्यंत योग्य ठरणाऱ्या उत्कृष्ट मधमाश्या आहेत हे आता प्रयोगांती स्पष्ट झाले आहे.

दंशहीन मधमाश्या वापरून मधमाशीपालन करताना या मधमाश्यांची ठळकपणे जाणवणारी वैशिष्ट्ये :-
(१) पोयाच्या माश्यांचा आकार खूप लहान असल्यामुळे या माश्या आंबा, टोमॅटो अशा अगदी छोट्या आकाराच्या फुलांमध्ये देखील सहजगत्या प्रवेश करू शकतात.
(२) एकदा पेटीत ठेऊन पाळलेल्या पोयाच्या माश्या त्यांची नीट काळजी घेतल्यास शक्यतो पेटी सोडून पळून जात नाहीत.
(३) पोयाच्या माश्या ह्या अन्न गोळा करण्याकरिता पेटी ठेवलेल्या ठिकाणाच्या आसपास अगदी कमी क्षेत्रफळात हिंडतात. समजा कोणी सभोवतालच्या भागात आपल्या बागा किंवा शेतांमध्ये रासायनिक कीडनाशके, कीटकनाशके, इत्यादींचा प्रयोग करत असेल तर या माश्या तिथपर्यंत पोहोचू शकत नसल्यामुळे त्या फवारणीचा या पेटीत पाळलेल्या माश्यांच्या वसाहतीवर कोणताही विपरीत परिणाम होत नाही आणि अगदी झालाच तर नगण्य परिणाम होतो. अशा अवस्थेत ह्या चिवट माश्या उत्तम तग धरू शकतात.
(४) पोयाच्या माश्या ह्या वर्षाला साधारणपणे १०० ते २०० ग्रॅम मधाचे उत्पादन देऊ शकतात. परंतु त्यांनी निर्माण केलेला मध हा अतिशय औषधी असून तो अत्युत्कृष्ट गुणवत्तेचा मध समजला जातो.

पोयाच्या माश्या ह्या दंश करत नसल्यामुळे त्यांचा माणसांना व इतर प्राण्यांना कोणताही उपद्रव होत नाही. त्यामुळे इतर पाळीव प्राण्यांसारखं ह्या मधमाश्या छंद म्हणून कोणीही व्यक्ती पेटीत पाळू शकते. या पेट्या घरातील सेंद्रिय परसबागांमध्ये, गच्चीवरील बागांमध्ये ठेवता येतात. तसेच शेतकरी ह्या मधमाश्या पेटीत पाळून त्या पेट्या शेतांमध्ये ठेवू शकतात आणि अशा तऱ्हेने पेटीतील मधमाश्यांकडून घडणाऱ्या परागीभवनाचा लाभ घेऊ शकतात.
पोयाच्या माश्या ह्या भारतातील स्थानिक प्रजातीच्या मधमाश्या आहेत. बस्स! या उपर आणखी काय हवं?
ह्या स्थानिक, दंशहीन मधमाश्या वापरून आत्तापर्यंत भारतामध्ये दक्षिणेकडील प्रांतात मधमाशीपालन केले जाई. पण आता पुणे येथील बी बास्केट ही मधमाशी संवर्धन करणारी संस्था या दंशहीन मधमाश्या वापरून मधमाशीपालनासाठी पेट्या तयार करून देत आहे ही नक्कीच पर्यावरण रक्षणाकरिता महत्त्वाची गोष्ट आहे. हे मधमाशीपालन सर्वार्थाने उपयुक्त ठरणारे आहे.
टीप:- या मधुपेट्यांविषयी अधिक माहितीकरिता बी बास्केट हेल्पलाईन नंबर 8308300008 वर आपल्या नावासहित संदेश पाठवावा.
लेखिका – प्रिया फुलंब्रीकर
सदस्य, टीम बी बास्केट