आपल्याला जर आपल्या
गच्चीवरील बागेत किंवा अंगणातील परसबागेत मधमाशा याव्यात असे वाटत असेल तर तिथे पुढील मधमाशी-प्रिय वनस्पतींची लागवड करावी:-
वृक्ष: बेल, शेवगा, हादगा, शमी, ताम्हण
फळझाडे: चिंच, जांभूळ, बोर, लिंबु/संत्रे/पपनस/मोसंबी, आंबा, आवळा, करवंद, पेरू, डाळिंब, चेरी, पीअर, स्ट्रॉबेरी
वृक्षक, झुडुपे: कुंती, कढीपत्ता, हॅमेलिया, निर्गुडी, अडुळसा, मेंदी, कॉफी, कापूस
फुलझाडे: गुलाब, चित्रक, निशिगंध, झिनिया, कॅलेंडुला, झेंडू, अस्टर, डेझी, डेलीया, हॉलीहॉक, लेडीज लेस, सोनकी, तुळस, सब्जा, ओवा, तेरडा, हळदी कुंकू, लाजाळू, लिली
पुष्पलता-वेली: मधुमालती, आईसक्रिम क्रिपर, रानजाई, कृष्णकमळ
धान्ये: मका, बाजरी, ज्वारी
डाळी: मूग, तूर, उडीद, मटकी
गळिताची धान्ये (तेलबियांकरता): तीळ, जवस, कारळा, मोहरी, सूर्यफुल, करडई, अंबाडी
भाज्या (भाज्यांच्या बियाणीकरता): राजगिरा (लाल माठ), हिरवा माठ, काटेमाठ, पालक, कोबी, कॉलीफ्लॉवर, कांदा, लसूण, मुळा, गाजर, बीट, नवलकोल
फळभाज्या: भेंडी, वांगी, मिरची, काकडी, टोमॅटो, भोपळा, तोंडली, कारली, पडवळ, दोडका, घोसाळे
मसाल्याच्या वनस्पती: वेलदोडे, जिरे, धणे, बडीशेप, मिरी, दालचिनी, तमालपत्र
पाणवनस्पती: कमळ, वॉटर लिली
आपल्या बागेमध्ये मधमाशा येऊन त्या तिथे दीर्घकाळ टिकाव्यात यासाठी घ्यावयाची काळजी पुढीलप्रमाणे:-
१) गच्चीत बाग करायची असल्यास मोठ्या आकाराच्या वृक्षांची कलमे (उदा.आंबा, शेवगा) करून ती ड्रम किंवा मोठ्या कुंडीत लावता येतात.
२) बागेत वर्षभर फुले येऊ शकतील अशा वेगवेगळ्या वनस्पतींची निवड करून लागवड करावी.
३) बागेत रासायनिक खते, कीटकनाशके यांचा वापर न केल्यास मधमाशा आणि इतर मित्र कीटक आपोआप येतात. त्यामुळे जैविक खते व औषधे यांचा जास्तीतजास्त वापर करावा.
४) मधमाशांकरता बागेतील वाफ्यात एका मातीच्या भांड्यात स्वच्छ धुतलेले दगड टाकून मग त्यात स्वच्छ पाणी ठेवावे.
५) मधमाशांनी बागेत पोळे केले असल्यास आपल्या बागेत व आसपास उत्तम जीवविविधता आहे याचे ते द्योतक समजावे. त्या मधमाशांमुळे पर-परागीभवन घडून चांगल्या प्रतीची फळे-पिके मिळतील याचा आनंद मानवा.
६) त्या नैसर्गिक अधिवासातील पोळ्यास हात लावू नये व त्याच्याजवळ पण जाऊ नये. कारण कामकरी माशा पोळ्याचे रक्षण करण्याकरता कायम सतर्क असतात व त्यांच्या हद्दीत गेल्यास त्या आपल्यावर हल्ला करण्याची शक्यता असते.
७) बागेमध्ये मधुपेटी ठेवलेली असल्यास त्याची योग्य कालांतराने हाताळणी करून निगा राखावी.
लेखिका – प्रिया फुलंब्रीकर
(टीम बी बास्केट)