My Cart
0.00

मधमाशी

सुमारे तीन वर्षांपूर्वी अमित गोडसे हा अभियंता मुंबईतील एका नामांकित सॉफ्टवेअर कंपनीत नोकरी करत होता. त्यावेळी दिवाळीच्या सुट्टीत तो पुणे येथील त्याच्या घरी आला तेव्हा त्याला त्याच्या बिल्डिंगमध्ये पेस्ट कंट्रोलने हजारो मधमाशा मारून टाकलेल्या आढळल्या. ते दृष्य बघून त्यास वाटले की या मधमाशांनी कोणाला काही इजा केली नव्हती तरी भीतीपोटी त्यांना उगाच मारून टाकले गेलेय. त्यास दुःख होऊन याकरता काहीतरी केले पाहिजे हा विचार त्याच्या मनात घर करून राहीला. या घटनेनंतर कितीतरी दिवस त्याने अस्वस्थतेत काढले मग आपण स्वतःच काहीतरी करावे ही जिद्द त्याने मनाशी बाळगली. या जिद्दीने पेटून त्याने सुस्थित नोकरीचा सरळ राजीनामा देऊन टाकला आणि ‘मधमाशा वाचवणे’ हे आपले कर्तव्य मानून ‘मधमाशांचे संरक्षण व संवर्धन’ हेच आयुष्याचे ध्येय मानले. या ध्येयातून त्याने मधमाशांविषयी सविस्तर वाचन व निरीक्षणास सुरुवात केली. सन २०१४ मध्ये मधमाशीविषयक रीतसर प्रशिक्षणदेखील घेतले. त्यानंतर त्याने ठिकठिकाणी जाऊन मधमाशा वाचवण्यास सुरुवात केली व सन २०१६ मध्ये मधमाशी विषयक चळवळीस व्यापक स्वरूप यावे म्हणून पुणे येथे ‘बी बास्केट’ ह्या सामाजिक संस्थेची स्थापना केली.

अमितने रायपूर येथील सरकारी कॉलेजमधून मेकॅनिकल इंजिनीयरिंगची पदवी घेतली असून तो सध्या पूर्णवेळ बी बास्केटच्या माध्यमातून मधमाशी संरक्षण व संवर्धनाचे कार्य करत आहे. या कार्यात त्याचे काही शिक्षक व सहकारी त्यास मदत करतात.

‘मधमाशी वाचवणे का गरजेचे आहे?’
मानवाच्या उत्क्रांतीपूर्वी सपुष्प वनस्पती पृथ्वीतलावर निर्माण झालेल्या होत्या. त्यावेेळी त्या वनस्पतींंचे परागीकरण करण्याकरता काही कीटक निर्माण झाले. त्या कीटकांपैकीच एक महत्वाचा कीटक म्हणजे ‘मधमाशी’ होय.

मधमाशी हा ‘सामुदायिक जीवन जगणारा समूह प्रिय’ कीटक असून तो ‘एपिस’ ह्या प्रजातीत मोडतो. संपूर्ण भारतामध्ये निसर्गात एपिस प्रजातीतील एकूण तीन प्रकारच्या मधमाशा सापडतात. त्या माशा म्हणजे ‘एपिस डॉरसाटा (दगडी उर्फ आग्या माशी)’, ‘एपिस सिराना इंडिका (भारतीय सातेरी माशी)’ व ‘एपिस फ्लोरिया (फुलोरी माशी)’. याशिवाय भारतात ‘एपिस मेलिफेरा (युरोपीय/इटालियन माशी)’ ही माशी मधुपेटीत पाळण्याकरता आयात करण्यात आली आहे. तसेच एपिस गटात न मोडणारी ट्रायगोना ही दंश न करणारी व आकाराने सर्वांत लहान असणारी मधमाशीदेखील भारतात सर्वत्र सापडते. सध्या भारतात सातेरी व युरोपीय माशी ह्या दोन प्रकारच्या मधमाशा पेटीत पाळून मधमाशीपालन केले जाते.

माणसाच्या स्वार्थामुळे दिवसेंदिवस प्रदूषणाच्या पातळीत होणारी वाढ मधमाशांच्या नाशास कारण ठरत आहे. शेतातील पिकांवर होत असलेली घातक रसायनांची फवारणी मधमाशांच्या जीवावर बेतत आहे. शहरात सर्वत्र मोठ्या प्रमाणावर होत असलेली वृक्षतोड, सिमेंटच्या उंच इमारती, जंगलांची कमी होणारी संख्या यांमुळे मधमाशांचा नैसर्गिक अधिवास नष्ट होत आहे. उंच मोबाईल फोन टॉवर्समधून येणाऱ्या विद्युतचुंबकीय लहरींमुळे पोळ्यांकडे परतणाऱ्या मधमाशा दिशाहीन होऊन वाटेतच मरून पडत आहेत. याशिवाय समाजात मधमाशी विषयक अज्ञान व गैरसमज असल्यामुळे अनेक ठिकाणी मधमाशा व पोळी एकतर जाळून टाकली जात आहेत किंवा त्यांवर पेस्ट कंट्रोलचा घातक उपाय करून ती नष्टतरी केली जात आहे. मधमाशी वाचवण्याकरता आत्तापासूनच पाऊले उचलली पाहिजेत.

मधमाशी वाचवणे आवश्यक आहे कारण मधमाशी मानवास पुढीलप्रमाणे अनेक प्रकारे सहाय्यकारक ठरते:-

१) मधमाशांमार्फत उत्कृष्ट परागीकरण घडते. त्यामुळे झाडांवरील फळांची व शेतातील पिकांची संख्या व गुणवत्ता अनेकपटीने वाढते.

२) ह्या परागीकरणामुळे वनस्पतींची संख्या वाढते आणि अनेक प्रकारच्या वनस्पतींचे वाण टिकून राहण्यास मदत होते. अशाप्रकारे निसर्गात जैवविविधता राखण्यास मदत होते.

३) मधमाशांपासून अनेक उपयुक्त पदार्थ मिळतात. उदाहरणार्थ, मध, मेण, पराग, प्रोपोलिस, राजान्न, इत्यादी.

‘बी बास्केटचे मधमाशी संरक्षण व संवर्धन कार्य’
१) शाळा, कॉलेज, विविध कंपन्या, गृहरचना संस्था, निसर्ग संवर्धन संस्था, ग्रामीण भाग, इत्यादी ठिकाणी जाऊन मधमाशी संदर्भात जनजागृती करणे.

२) शेतकरी, आदिवासी, गिरीजन, हौशी मधपाळ यांना शास्त्रीय पद्धतीने मध काढण्याचे प्रशिक्षण देणे.

३) आर्थिकदृष्टया दुर्बळ घटकांकडून शास्त्रीय पद्धतीने काढलेला मध विकत घेऊन त्यांना अर्थार्जनाची संधी उपलब्ध करून देणे.

४) मधमाशीजन्य शुद्ध पदार्थांची (उदाहरणार्थ, मध, इत्यादी) विक्री करणे.

५) मधमाशीपालनास चालना मिळावी म्हणून मधुपेट्यांची विक्री करणे व या जैविक तंत्रज्ञानाचे शिक्षण देणे.

६) शहरवासीयांकरता मधमाशी प्रशिक्षण कार्यशाळा घेणे.

मधमाशांतर्फे घडणाऱ्या परागसिंचनामुळे अनेकविध वनस्पती आणि त्यांच्यावर अवलंबून असणारे प्राणी यांची संख्या वाढते. त्यातून निसर्गात तयार होणाऱ्या अन्न साखळीमुळे माणसाचा प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरित्या फायदा होत असतो. म्हणून ‘बहुगुणी मधमाशी’ हा मानवास उपयोगी पडणारा ‘मित्र कीटक’ असून मधमाशांना वाचवणे म्हणजे माणसाने मनुष्यजातीचेच रक्षण करणे होय.

– प्रिया फुलंब्रीकर
सचिव, बी बास्केट सोसायटी
मो.क्र.९७६६६२३४०९

मुंबई येथील ‘पंचायत भारती’ पाक्षिकात बी बास्केटतर्फे प्रसिद्ध झालेल्या लेखमालेतील लेख क्र.१, २, ३ आणि ४

4 thoughts on “मधमाशी

  1. मला 1महिण्यासाठी मधमाशी पेटी भाडेतत्त्वावर कोठे मिळेल ह

Leave your thought