My Cart
0.00
Blog

सदाबहार सेंद्रिय बागबगीचा

‘ सदाबहार सेंद्रिय बागबगीचा 💥🌿🐜🐞🐛🦋🕷🌸🐝🦋🌱🌾🌻’

दिवसेंदिवस लोकसंख्येचा महापूर लोटणाऱ्या शहरांमधील सिमेंटच्या जंगलात विविध तऱ्हेच्या प्रदूषणामुळे जीव अगदी घुसमटून जातो आणि मग निसर्गाकडे वळावेसे वाटते. या भावनेतूनच आपण घराच्या गच्चीवर किंवा घरास अंगण असेल तर अंगणात हौसेने बागबगीचा तयार करून त्यात आवडती फुलझाडे-फळझाडे लावतो. अगदी तेवढी सुद्धा जागा उपलब्ध नसेल तर घरातील बाल्कनीत कुंड्या ठेवून त्यात आवडती झाडे-झुडुपे लावून हिरवा कोपरा तयार करतो. आपण हौसिंग सोसायटीमध्ये राहत असू तर त्यामधील मोकळ्या जागेमध्ये सगळ्या निसर्ग प्रेमी सदस्यांना एकत्र घेऊन सार्वजनिक बाग फुलवतो.

     हळूहळू आपण तयार केलेली बाग बहरायला लागते आणि मग आपले मन पण त्या हिरवाईत हरखून जाते. मायेने जोपासलेल्या निसर्गाच्या हिरव्या पसाऱ्यात दररोज रममाण व्हायला आवडू लागते. यामुळे शहरातील दैनंदिन व्यवहाराने कंटाळलेल्या रुक्ष जीवनात निखळ आनंद निर्माण होतो. बागेतील हिरवीगार झाडे-झुडुपे, लता-वेली यांच्या शीतल छायेत डुंबत असताना त्या तरुवरांवर बसून मंजुळ स्वरात गात असलेले पक्षी आपल्या मनास भुरळ घालतात. बागेमधील रंगीबेरंगी फुलांच्या ताटव्यांत बागडणारी चित्रविचित्र फुलपाखरे, अखंड गुंजारव करणारा भुंगा आणि फुलांभोवती अविरत गुणगुणणाऱ्या मधमाश्यांची लगीनघाई हे मोहक दृष्य न्याहाळताना रोजच्या धकाधकीने आलेला शीण कोठच्याकोठे पळून जातो व मनास प्रसन्नता लाभून मन पुन्हा ताजेतवाने होते. ही अजब किमया साधणारी आपली बाग मग घरातील कुटुंबीयांचे, पै-पाहुण्यांचे विरंगुळ्याचे आवडते ठिकाण बनते. मग आपल्याला आपण मेहनत घेऊन बागबगीचा तयार केल्याचे सार्थक झाले असे वाटते.

    आपण निसर्गप्रेमातून हौसेने बाग तयार करतो तेव्हा त्यातून आपल्या मनास निर्व्याज आनंद मिळत असतो. त्यामुळे सध्याच्या करोनाविषाणूसारख्या वैश्विक संकटाच्या काळात देखील आपल्याही नकळत आपला बागबगीचा हा आपल्याला जगण्यास बळ पुरवणाऱ्या सकारात्मक उर्जेचा अक्षय्य स्रोत ठरतो. बाग तयार करून त्याची निगराणी राखण्याचे आपल्या मानसिक व शारिरीक  आरोग्यावर चांगले परिणाम होताना दिसून येतात. याशिवाय बाग तयार करण्याच्या ह्या एका छोट्याशा कृतीतून आपल्या हातून नकळतपणे जैवविविधतेचे संवर्धन ही महत्त्वाची निसर्गसेवा घडत असते. जेव्हा बागेत लावलेल्या झाडा-झुडुपांची छान वाढ होऊन ती बहरायला लागतात त्यावेळी त्यांवर नाना प्रकारचे पक्षी, फुलपाखरं, पतंगं, भुंगे व मधमाश्या असे परागीकरणाची बहुमुल्य सेवा देणारे जीव येतात. तसेच ‘जीवो जीवस्य जीवनम्‘ या निसर्ग नियमानुसार यातील काही जीवांचे भक्षक असलेले कोळी, सरडे, शिकारी पक्षी असे जीवदेखील बागेत येतात. यातील काही सजीव नित्यनेमाने बागेस भेट देत असतात तर काही सजीव बागेतील झाडांवर वास्तव्य करून बागेत मुक्काम करताना दिसून येतात. गोंडेदार शेपटीची चपळ खारुताईदेखील बागेत वावरताना व बागेतील एखाद्या झाडावर घरटे करून त्यात राहताना दिसून येते. अशाप्रकारे आपली बाग या सगळ्या जीवांना अन्न पुरवणारी अन्नदाता असते शिवाय आश्रय देणारे वसतीस्थानदेखील असते. या सर्व जीवांचे जीवनचक्र आपल्या बागेशी जोडलेले असते त्यामुळे त्यांचे आपल्या बागेशी खास नाते तयार झालेले असते. यातील परागीकरण करणारे जीव आपल्या बागेव्यतिरिक्त घरासभोवताली असलेल्या वनस्पतींच्यादेखील फुलांवर अन्नासाठी जात असतात. तेव्हा वनस्पतींच्या फुलांमधून मधुरसरूपी अन्न घेतेवेळी त्या जीवांकडून परागीकरणाची अमूल्य सेवा घडत असते.  त्यामुळे आजूबाजूच्या परिसरातील जैवविविधता छान वाढीस लागते. आपली बाग स्थानिक जीवविविधता राखण्यात व वृद्धिंगत करण्यात अशाप्रकारे योगदान देत असते; त्यामुळे आपण नीट विचारपूर्वक बाग तयार केली तर त्याचा नक्कीच अधिक फायदा आपल्याला व पर्यावरणाला होईल.

    आता सेंद्रिय बगीचा तयार करताना आपण कोणती काळजी घ्यावी, बाग कशी तयार करावी आणि आपल्या बागेच्या माध्यमातून निसर्ग संवर्धन होण्यासाठी काय करावे याबद्दल माहिती घेऊया:-
(१) मधमाश्या, फुलपाखरं, पक्षी हे परागीकरण करणारे जीव आपल्या बागेत यावेत म्हणून त्यांना आकर्षित करणाऱ्या विविध स्थानिक वनस्पती, आपल्याला दैनंदिन जीवनात उपयुक्त पडणाऱ्या खाद्य व औषधी वनस्पती यांची व्यवस्थित यादी तयार करावी. त्या यादीप्रमाणे पुढे नर्सरीमधून ही रोपे आपल्याला विकत घेणे सोईचे ठरते.


(२) सेंद्रिय पद्धत अवलंबणाऱ्या खात्रीशीर रोपवाटिका शोधून तिथून रोपांची खरेदी करावी.


(३) बागेत विदेशी वेली-झुडुपे-क्षुपे-गवते लावण्यापूर्वी ती आक्रमक नसून त्यांचा स्थानिक जीवविविधतेस संभाव्य धोका तर नाही ना? याचा खोलवर विचार करून मगच त्याप्रमाणे कृती करावी.


(४) बागेत एकाच प्रजातीची झाडे न लावता विविध प्रजातींचा वापर करावा. यामुळे जीवविविधता वाढीस लागण्यास मदत होते.


(५) बागेत साधारण वर्षभर फुले देणाऱ्या जास्वंद,
शेवगा, तगर, सदाफुली, अबोली, कर्दळी, कुंती अशा वनस्पतींचा देखील जरूर वापर करावा म्हणजे आपली बाग सदाबहार राहून आपल्यास नेत्रसुख तर देईलच; शिवाय परागीकरण करणाऱ्या पक्षी आणि फुलपाखरु, मधमाशी यांसारख्या कीटकांस आपल्या बागेतून सतत खाद्यपुरवठा होत राहील.


(६) आपल्या बागेचे  क्षेत्रफळ लक्षात घेऊन त्यानुसार कुंड्या व वाफ्यांची संरचना करावी. कुंड्या शक्यतो मातीच्याच वापराव्यात म्हणजे त्या उन्हाने तापत नाहीत आणि मातीच्या असल्यामुळे कुंडीत हवा खेळती राहण्यास मदत होते. वाफे तयार करताना तळात अंथरायला दणकट प्लॅस्टिक व कडेने वीटांचा वापर करावा. सिमेंटचा वापर शक्यतो टाळावा.


(७) बाग तयार करण्यापूर्वी सर्वांत आधी मातीची सोय करावी. त्यासाठी घरातील ओल्या कचऱ्यापासून तयार केलेली माती, झाडांची वाळकी पाने, फांद्या, काड्या, कोकोपीट इत्यादी गोष्टींचा वापर करावा.


(८) बागेकरिता जागा मर्यादित असेल तर टेरेरियम, मायक्रोग्रीन, हँगिंग कुंड्या, व्हर्टिकल गार्डनिंग पद्धत यांचा अवलंब करावा. अगदी बाटलीत पाणी भरून त्यांत सिंगोनियम, मनीप्लांट यांसारख्या वनस्पती आपण वाढवू शकतो. बाटलीतील वनस्पती घरात सौम्य सूर्यप्रकाश येत असलेल्या ठिकाणी ठेवू शकतो. खिडकीच्या बाहेरदेखील window pots तयार करून त्यात आवडीच्या वनस्पती लावू शकतो.


(९) घरामध्ये शोभेची घायपात, रबर प्लांट, कोरफड यांसारखी सावलीतसुद्धा वाढणारी झाडे कुंड्यांमध्ये लावता येतात. ही झाडे प्रदूषणाला दूर ठेवून घरातली हवा शुद्ध ठेवतात.
(१०) बागेतील झाडांच्या तळाशी मातीच्या पृष्ठभागावर हिरवे आच्छादन किंवा वाळलेल्या पानाफांद्यांचे आच्छादन करणे गरजेचे आहे. यामुळे थेट पडणाऱ्या प्रखर सुर्यकिरणांपासून झाडांच्या मुळांचे संरक्षण होते व मातीत ओलावा टिकून राहण्यास मदत होते.


(११) बागेस कुंपणाची आवश्यकता असल्यास निवडुंग, निर्गुडी इत्यादी वनस्पती वापरून जैविक कुंपण तयार करावे. भिंत तयार करायची आवश्यकता असल्यास दगड वापरून गडगा तयार करावा.


(१२) बागेमध्ये वापरली जाणारी जीवामृतासारखी सेंद्रिय खते, दशपर्णी अर्कासारखी सेंद्रिय कीडनाशके,  इत्यादी तयार करण्याची पद्धत स्वतः शिकून घ्यावी. स्वतः तयार करणे शक्य होत नसेल तर या पदार्थांचे खात्रीशीर विक्रेते शोधावेत व त्यांच्याकडून यांची खरेदी करावी.


(१३) मोकळा वेळ मिळेल तेव्हा बागेतील व आजूबाजूच्या परिसरातील देशी वनस्पतींच्या बिया गोळा करून स्वतः त्यांची रोपे तयार करावीत. ह्या रोपांची आपल्याला योग्य ठिकाणी लागवड करता येते. शिवाय सण-समारंभ अशा निमित्त्याने ती रोपे इतरांना भेट म्हणून देता येतात. आपल्या निसर्गप्रेमी मित्रमैत्रिणींबरोबर अशा रोपांची देवाणघेवाण करता येते. या रोपांची विक्री करून व्यवसाय देखील उभारता येतो.
या गोळा केलेल्या बिया तसेच आपण खातो त्या फळांच्या बिया कचर्‍यात टाकण्याऐवजी बाहेरगावी जाताना त्या बिया आपल्या बरोबर घेऊन जाऊ शकतो व रस्त्यावरील एखाद्या जागी जिथे थोडीशी झाडेझुडुपे किंवा गवत आहे अशा ठिकाणी टाकून देऊ शकतो. या बियांचे सीड बॉल करून देखील ते अशा ठिकाणी टाकता येतात. यामुळे त्या जागी बियांमधून यथावकाश रोपे उगवून हिरवाई निर्माण होऊ शकते. याशिवाय अनेक संस्था देशी वनस्पतींच्या बिया गोळा करून त्यांची रोपे तयार करतात. त्यांना ह्या बिया नीट पाकिटात भरून, पाकिटावर वनस्पतीचे नाव आणि तारीख घालून आपण सुपूर्त करु शकतो.

(१४) आपल्या बागेत येणारे पक्षी, कृमी-कीटक, प्राणी यांच्या नोंदी ठेवाव्यात. या निरीक्षणातून आपला निसर्गाचा अभ्यास वाढीस लागण्यास मदत होते. तसेच इतर संशोधकांना आपण केलेल्या नोंदींचा उपयोग होऊ शकतो.


(१५) दररोज (आणि उन्हाळ्यात तर न चुकता) बागेत येणारे पक्षी, कीटक व छोटे प्राणी यांच्याकरिता मातीच्या पसरट भांड्यात पिण्यासाठी स्वच्छ पाणी ठेवावे. याचे कारण आपण बरेचसे पाणवठे हे इमारती, रस्ते यांचे त्यांवर बांधकाम करून नष्ट केलेले आहेत आणि अस्तित्वात असलेले पाणवठे प्रदूषित करून ठेवलेले आहेत. तसेच पक्षी व खारीसारख्या छोट्या प्राण्यांना पिण्यासाठी पाणी ठेवल्यामुळे त्यांच्या रानटीपणावर कोणतीही गदा येत नाही. त्या भांड्याचा bird bath म्हणून देखील उपयोग होतो. पक्षी त्यात आरामात अंघोळ करू शकतात.परंतु पक्ष्यांकरिता कृत्रिम घरटी व फीडर्स ठेवण्याची मात्र खरी गरज नक्कीच नाही. अशी कृत्रिम घरटी व फीडर्स वापरल्यामुळे पक्ष्यांचा मूळचा रानटीपणा नष्ट होऊ शकतो. पक्षी व प्राणी हे उपजतच स्वतःचे अन्न शोधण्यास व विणीच्या हंगामात स्वतःची घरटी बांधण्यास सक्षम असतात. त्यांना अन्न व वास्तव्य पुरवणाऱ्या झाडाझुडुपांचीच फक्त गरज असते. आपण अनेक वर्षे अमर्याद वृक्षतोड केलेली आहे. त्यामुळे योग्य वृक्षांची योग्य ठिकाणी लागवड करून पक्षी व प्राणी यांच्यासाठी पूर्वी जसा समृद्ध अधिवास होता तसा परत निर्माण करण्याची सध्या खरी गरज आहे.


(१६) पक्ष्यांसाठी घरटे बांधणे सोयीचे जावे म्हणून बागेच्या एका वावर नसलेल्या कोपऱ्यात त्यांच्यासाठी काडीकचरा जरुर ठेवावा. तसेच तिथे थोडी धूळ व माती चिमण्यांच्या अंघोळी (mud bath) साठी राखून ठेवावी.


(१७) बागेतील फुले, फळे व वनस्पतींचे फोटो जरूर घ्यावेत व आवश्यक ठिकाणी पाठवावेत. परंतु बागेतील पक्ष्यांच्या घरट्यांचे व पिल्लांचे जवळून फोटो घेणे टाळावे. कारण पिल्लं झाल्यावर त्यांच्या संगोपनासाठी अधिक सजग व संवेदनशील झालेल्या पालक पक्ष्यांना आपला हा उपद्रव मुळीच आवडत नाही. ते ती जागा सोडून दुसरीकडे जाऊ शकतात. याचा पिल्लांच्या जीवावर विपरीत परिणाम होऊ शकतो.


(१८) घराच्या गच्चीत, बाल्कनीत मोठी झाडे लावणे शक्य नसेल तर त्यांची कलम केलेली रोपे मोठ्या कुंड्या, ड्रम यांमधून लावावी. त्यांत शेवगा, सोनचाफा, चिंच, डाळींब, अनंत इत्यादी कलमी रोपांची उत्तम वाढ होताना दिसते.


(१९) बागेत जागा उपलब्ध असेल तर छोटे तळे तयार करून त्यात कमळ, वॉटर लिली, अझोला यांसारख्या पर्यावरणास उपकारक असलेल्या पाणवनस्पती आपण लावू शकतो. त्या तळ्यामध्ये गप्पी, कोई यांसारखे मासे पाळू शकतो. त्यामुळे डासांवर नियंत्रण ठेवता येते.


(२०) बागेत शास्त्रीय पद्धतीनुसार मधमाशीपालन करू शकतो. या मधमाश्यांमुळे बागेत व व सभोवतालच्या भागात उत्तम परागीकरण होते. याशिवाय त्यांनी मधुपेटीत तयार केलेल्या पोळ्यापासून आपल्याला सेंद्रिय मध, मेण असे आरोग्यदायी पदार्थ मिळू शकतात.

(२१) बागेकरिता पाण्याची उपलब्धता बघणे आवश्यक आहे. तिथे छोटा हौद तयार करून त्यात पाणी साठवू शकतो. गरजेनुसार ठिबक सिंचन पद्धत, तुषार सिंचन (स्प्रिंकलर) पद्धत वापरून बागेत पाण्याचे नियोजन करू शकतो. रेन वॉटर हार्वेस्टिंग, ग्रे वॉटर हार्वेस्टिंग या पद्धतींचा अवलंब करू शकतो.

(२२) बागेत जागा उपलब्ध असल्यास तिथे गांडूळ खत प्रकल्प राबवू शकतो.

(२३) उपयुक्त तणे व उपद्रवी तणे यांमधील फरक ओळखून उपद्रवी तणे वेळीच उपटून टाकावीत. त्या उपटलेल्या तणांचे बागेतील झाडांच्या तळाशी मातीच्या पृष्ठभागावर आच्छादन करू शकतो.


(२४) बागेतली सेंद्रिय फळे, सेंद्रिय भाज्या यांचा स्वतःच्या कुटुंबासाठी उपयोग होतो. Grow Your Own Food या संकल्पनेचा आपण आदर्श पायंडा पाडू शकतो. सेंद्रिय फळे, भाज्या आणि बियाणे यांची विक्री देखील करू शकतो.


(२५) बागेतील पानाफुलांचा देखील विविध तऱ्हेने उपयोग करून घेता येतो. उदाहरणार्थ, देशी गुलाबाच्या पाकळ्यांपासून गुलकंद तयार करता येतो. ओव्याची पाने सावलीत वाळवून त्याची भुकटी करून ठेवू शकतो. ती भुकटी स्वयंपाकात वापरता येते.


(२६) बागेत गळून पडलेल्या वाळक्या फांद्या, वाळलेली फुले, पाने, फळे यांपासून कल्पकता वापरून घरात सजावट म्हणून dry arrangement करू शकतो. सणासुदीला बागेतल्या फुले-पानांच्या रांगोळ्या घालू शकतो व सजावट म्हणून पुष्परचना करू शकतो.

(२७) सर्वांत महत्वाचे म्हणजे आपण तयार केलेल्या बागेबद्दल, बाग तयार करताना केलेले प्रयोग व त्यातून आलेल्या अनुभवांबद्दल जरूर आपल्या मित्रमैत्रिणींना, इतर निसर्गप्रेमींना सांगावे. यातूनच जनजागृती होऊन दुसऱ्या व्यक्तीस सेंद्रिय बाग तयार करण्यास योग्य माहिती व प्रोत्साहन मिळू शकते. अधिकाधिक लोकांनी बागबगीचा निर्माण केल्यास त्याचा फायदा सर्व जीवसृष्टीला होतो व सभोवतालचे पर्यावरण राखण्यात प्रत्येकास खारीचा वाटा उचलला येतो.

प्राचीन भारतीय वाङ्मयात वाटिका अर्थात बागेचे अनेक उल्लेख आढळतात. उदाहरणार्थ, रामायणात वर्णन केलेली अशोक वाटिका ज्यामध्ये रावणाने सीतेला नजरकैदेत ठेवले होते. तसेच श्री समर्थ रामदास स्वामींचे बाग प्रकरणदेखील प्रसिद्ध आहे. श्री साईबाबांनी शिर्डी येथे लेंडी बाग तयार केली होती हे पण सर्वश्रुत आहे. शिवाय पूर्वी अनेक राजेरजवाडे यांनी आपल्या राजवटीत बागा केल्याचा उल्लेख इतिहासात सापडतो. उदाहरणार्थ, काश्मीरमधील श्रीनगर येथे शालिमार बाग ही मोगल बादशहा जहांगीर याने तयार केली. पुण्यात श्रीमंत पेशवे यांनी सारस बाग, कात्रज बाग, हिराबाग अशा प्रसिद्ध बागा तयार केल्या होत्या आणि त्यांचे अवशेष अजूनही अस्तित्वात आहेत. अशाप्रकारे पूर्वी हौस म्हणून राजेरजवाडे व इतर लोकं बाग निर्माण करायचे; परंतु अलीकडे निसर्गाचा ऱ्हास होण्यास मानव निर्मित प्रदूषण बहुतांशी जबाबदार असल्यामुळे या काळात शहरातील प्रत्येकास शक्य तितकं स्वतःचे अन्न स्वतः उगवण्याचे प्रयत्न करण्यासाठी आणि निसर्ग संवर्धनासाठी उपलब्ध होईल त्या जागेत बाग तयार करण्याची आवश्यकता आहे असं म्हटलं तर वावगे ठरू नये.

    बाग तयार करणे म्हणजे निसर्गाची छोटी प्रतिकृती निर्माण करणे असे जपानी लोकं मानतात व त्याप्रमाणे बाग तयार करतात. आपण आपल्याला रुचेल, पटेल व जमेल तशा पद्धतीनुसार सेंद्रिय बाग तयार करावी. अल्बर्ट आईन्स्टाईन यांनी म्हटले आहे, “Look deep into nature, and you will understand everything better.” तर आपण सतत निसर्गाकडून शिकत अधिकाधिक समृद्ध होऊया व त्यानुसार कृती करत जाऊया.

©ग्रीन बर्ड्स अभियान

https://www.facebook.com/GreenBirdsInitiative/

सेंद्रिय बागबगीच्यास खारुताईसारखे पाहुणे नित्यनेमाने भेट देतात. कधी बागेतल्याच उंच वाढ झालेल्या झाडावर घरटे करून त्यात वास्तव्य देखील करतात.

                     फोटो: प्रिया फुलंब्रीकर

बागेस नित्यनेमाने भेट देणारी खारुताई

बागेत तळे तयार करून त्यात लावलेली वॉटर लिली. फोटो: प्रिया फुलंब्रीकर

बागेत केलेल्या तळ्यातील वॉटर लिली

वाळलेल्या फांद्या, काड्या व पानं यांचे आच्छादन कुंदाच्या वाफ्यात केले आहे. कालांतराने ह्या आच्छादनाचे खतात रूपांतर होते. त्यावर परत परत आच्छादन करत राहायचे. फोटो: प्रिया फुलंब्रीकर 

वेलाच्या तळाशी केलेले आच्छादन

लेखक: प्रिया फुलंब्रीकर
टीम बी बास्केट

संस्थापक, ग्रीन बर्ड्स अभियान
हरित पृथ्वी, सुंदर पृथ्वी!

2 thoughts on “सदाबहार सेंद्रिय बागबगीचा

Leave your thought