My Cart
0.00

मधमाशांचे मह्त्व व मधमाशीपालन

शहरातील रोजच्या धकाधकीच्या जीवनात काही क्षण निवांत घालवता यावे म्हणून आपण उद्याने व बागा यांमध्ये जाऊन निसर्गाच्या सान्निध्यात रममाण होतो. आजूबाजूची हिरवीगार झाडे, मंजुळ स्वरात गाणारे पक्षी, पुष्करणी व त्यातील थुईथुई नाचणारे कारंजे, रंगीबेरंगी फुलांचे ताटवे या सर्वांमुळे चैतन्याची अनुभूती मिळून मन प्रसन्न होते व ताजेतवाने वाटते. तेथील फुलांवर बागडणारी फुलपाखरे, फुलांभोवती अखंड गुंजारव करणारा भुंगा व फुलांभोवती गुणगुणणाऱ्या मधमाशा हे दृष्य आपल्या चांगलेच ओळखीचे आहे. या सगळ्या कीटकांमधील ‘मधमाशी’ हा कीटक त्याच्यापासून आपल्याला अत्यंत प्रिय असणारा मध मिळतो म्हणून जास्त परिचित आहे. परंतु मधमाशांची शारीरिक रचना परागणाकरता अनुकूल असल्यामुळे त्यांच्याद्वारे अतिशय उत्तम परागसिंचन होते याबद्दल अजून आपल्या समाजात अनभिज्ञता आहे. या निसर्गदत्त गुणामुळे मधमाशांना पेट्यांमध्ये पाळून त्यांचा परागीकरणासाठी सर्वांत अधिक वापर केला जातो.

पेट्यांमध्ये कोणत्या मधमाशा पाळल्या जातात?

मधमाशी हा कीटक ‘एपिस’ या प्रजातीमध्ये मोडतो हे आपण मागील लेेखात पाहिले आहे. भारतात नैसर्गिक अधिवासात एपिस प्रजातीमधील एकूण तीन प्रकारच्या माशा सापडतात. या व्यतिरिक्त भारतात अस्तित्वात असणारी एपिस प्रजातीमधील एक प्रकारची मधमाशी ही युरोपीय माशी असून आपण ती मधमाशीपालनाकरता खास आयात केलेली आहे. या आयात केलेल्या एपिस मेलिफेरा म्हणजे युरोपीय माशा व स्वदेशी असलेल्या एपिस सिराना इंडिका म्हणजेच सातेरी माशा आपण मधूपेटीत ठेऊन पाळू शकतो. या माशांना पेटीतील बंदिस्त वातावरण मानवते व त्या पेटीत पोळे तयार करून तिथे उत्तम वसाहत निर्माण करू शकतात. बाकीचे दोन प्रकार हे एपिस डोरसाटा म्हणजे दगडी/आग्या माशा व एपिस फ्लोरिया म्हणजे फुलोरी माशा हे आहेत. या दोन प्रकारच्या मधमाशा आपण पेटीत ठेऊन पाळू शकत नाही कारण पेटीतील अंधार व बंदिस्त वातावरण त्यांना चालत नाही. याशिवाय ट्रायगोना नावाची सर्वांत छोटी असलेली मधमाशी देखील भारतात सापडते पण ती एपिस या प्रकारात मोडत नाही. ही मधमाशी आकाराने सर्वांत लहान असून तिच्यापासून चवीस अतिशय मधुर असा मध मिळतो. शिवाय ही छोटी मधमाशी उत्तम परागण करते. परंतु या माशांना पेटीत ठेवून पाळण्याचे तंत्र अजून म्हणावे तसे विकसित झालेले नाही.

पेट्यांमध्ये मधमाशा का पाळल्या जातात?

मधमाशीपालन हे उत्तम जैविक तंत्रज्ञान असून याद्वारे शेतकरी, आदिवासी व हौशी मधपाळ यांना कितीतरी फायदे मिळतात. मधूपेट्या शेतात, बागेत ठेवण्याचा सर्वांत महत्त्वाचा फायदा म्हणजे पेटीतील मधमाशांमार्फत उत्कृष्ट परागीकरण घडते. यामुळे झाडांवरील फळांची व शेतातील पिकांची संख्या व गुणवत्ता कितीतरी पटीने अधिक वाढते. पेटीतील मधमाशा भवतालच्या परिसरात भरपूर हिंडतात त्यामुळे तिथेदेखील उत्तम परागीकरण घडून जैवविविधता वाढलेली आढळून येते. याशिवाय पेटीत पाळलेल्या मधमाशांच्या पोळ्यांमधून मध, पराग, मेण, प्रोपोलिस, राजान्न वगैरे कितीतरी उपयुक्त पदार्थ मधपाळास मिळतात. यामुळे मधुपेट्या ठेवणाऱ्यांना आर्थिक लाभ होतो. म्हणून शेतकऱ्यांसाठी तर मधमाशीपालन हा उत्तम जोडधंदा ठरतो व अलिकडे शेतकऱ्यांच्या असहाय्यतेतून, निराशेतून घडणाऱ्या आत्महत्या वगैरे प्रश्नांवर हा प्रभावी उपाय ठरू शकतो. याकरता शेतकरी, जंगलातील आदिवासी, डोंगराळ भागातील गिरीजन, ग्रामीण भागातील ग्रामवासी या सर्वांनी मधमाशीपालन कसे करावे, पोळ्यांमधून शास्त्रशुद्ध पद्धतीनुसार मध कसा काढायचा या सर्व गोष्टींचे मधमाशी तज्ज्ञांकडून प्रशिक्षण घेणे अत्यावश्यक आहे.

शहरवासीयांनी तर सर्वप्रथम मधमाशी विषयक मुलभूत माहिती घेणे अत्यन्त गरजेचे आहे. कारण शहरात मधमाशांसंदर्भातील अज्ञानामुळे भीतीपोटी मधमाशी या मित्र कीटकांची पोळी एकतर आग लावून पूर्णपणे जाळली जातात किंवा त्यांवर पेस्ट कंट्रोलचा उपाय करून ती नष्ट तरी केली जातात. पेस्ट कंट्रोल हा तर घातक उपाय असून त्याचा विपरीत परिणाम माणसांच्या प्रकृतीवर सुद्धा होऊ शकतो. अशा प्रकारे हजारोंच्या संख्येने मधमाशा मारून नष्ट करणे म्हणजे आपल्याच पायावर आपण धोंडा मारून घेणे. याकरता शहरात सर्वत्र मधमाशी विषयक जाणीव जागृतीची गरज आहे. यामुळे शहरवासीयांचा मधमाशीकडे बघायचा दृष्टिकोन बदलेल व शहरातील जैवविविधता वाढीस लागून पर्यावरण संतुलन राखण्यास मदत होईल. शहरात राहणाऱ्या लोकांनी घराच्या अंगणात, गृह संस्थांमधील मोकळ्या आवारात व गच्चीवर बाग करणे हादेखील शहरातील पर्यावरण समतोल राखण्याच्या दृष्टीने एक अत्यंत स्तुत्य व उपयुक्त असा उपक्रम आहे. शहरवासीयांनी मधमाशीपालन तंत्र शिकून घेऊन या बागांमध्ये मधूपेट्या ठेवल्या तर त्यांची परसबाग लवकर बहरेल व त्यांना अधिक संख्येने फुले व फळे मिळतील. मधमाशांचे एकूण महत्व लक्षात घेता त्यांना निसर्गातील जैविक संपत्ती म्हणणे योग्य ठरेल. ही जैविक संपत्ती टिकवणे व त्यात उत्तरोत्तर भर पडत राहणे हे सर्व दृष्टीने हितावह आहे.

मधमाशा वाचवणे कसे शक्य आहे?

मधमाशांचे महत्व जाणून घेण्यासाठी मधमाशांविषयी वाचन करणे, सरकारमान्य संस्थेतून प्राथमिक शिक्षण घेणे आवश्यक आहे. मधमाशांसंदर्भात अधिक माहिती घेण्यासाठी प्रगत शिक्षण घेणे गरजेचे आहे. शेतात किंवा परसबागेत मधूपेटी ठेवण्यासाठी मधमाशीपालनाचे तंत्र शिकणे आवश्यक आहे. याशिवाय मोठ्या प्रमाणात लोकजागृती करण्याकरता मधमाशी तज्ज्ञाचे व्याख्यान तुमच्या भागात तुम्ही ठेवू शकता. तसेच मधमाशांचा नैसर्गिक अधिवास जपण्याकरता जंगल व देवराया वाचवणे, सगळीकडे राजरोसपणे होणारी वृक्षतोड थांबवणे, मधमाशांना खाद्य व वास्तव्य पुरवणारी झाडे लावणे, शहरातील पाणवठे स्वच्छ ठेवणे, मधमाशांना पोषक असलेली विषरहित शेती म्हणून सेंद्रिय किंवा नैसर्गिक शेती तंत्रज्ञानाचा पुरस्कार करणे व अवलंबन करणे असे अनेक उपक्रम तुम्ही हाती घेऊ शकता. अशा गोष्टींतून मधमाशी वाचवणे सहजशक्य आहे. मधमाशी वाचवण्याकरता सगळ्यांनी मिळून एकत्रितपणे प्रयत्न सुरू केल्यास मधमाशी संरक्षण व संवर्धनास नक्कीच ‘अच्छे दिन’ येतील यात काही शंकाच नाही.

चला तर मग बहुगुणी मधमाशांना वाचवू या!

लेखिका – प्रिया फुलंब्रीकर

सचिव, बी बास्केट सोसायटी

मुंबई येथील ‘पंचायत भारती’ पाक्षिकात बी बास्केटतर्फे प्रसिद्ध झालेल्या लेखमालेतील लेख क्र.१, २, ३ आणि ४.

2 thoughts on “मधमाशांचे मह्त्व व मधमाशीपालन

  1. लेख स्पष्ट मुद्देसुद आ. मधमाशाची आवड व समज वाढण्यासाठी महत्वाचा आहे.

  2. I am intrested in bee keeping ,please give me information from where I will get the bee colony in Nagpur.
    My contact no
    9422720778.
    Please share information on whatsapp.
    Vilas Ambade

Leave your thought