My Cart
0.00

मधमाशीजन्य उपयुक्त पदार्थ

मधमाशा ह्या परागीकरणाकरता सहाय्यकारी ठरतात हे आपण मागील भागात पाहिले. याशिवाय मधमाशांपासून मानवास अनेक उपयुक्त पदार्थ मिळतात. मधमाशांपासून मिळणारा सर्वांत लोकप्रिय पदार्थ म्हणजे ‘मध’ होय. परंतु मधमाशांपासून मधाव्यतिरिक्त मेण, पराग, रोंगण (प्रोपोलिस), राजान्न (रॉयल जेली) व विष (दंश) हे देखील अतिशय उपयुक्त पदार्थ मिळतात.

मधमाशांपासून मिळणाऱ्या ह्यातील प्रत्येक पदार्थाची आपण येथे थोडक्यात माहिती घेऊ.
१) मध:- ‘मध’ हा गुणकारी पदार्थ तयार करणारी माशी म्हणून ह्या माशीचे ‘मधमाशी’ असे नामकरण झाले.
कामकरी माशा फुलांमधील मकरंद गोळा करून त्यांच्या पोळ्यामध्ये परत येतात. नंतर पोटातील स्त्रवणाऱ्या द्रवाच्या मदतीने गोळा केलेल्या मकरंदाचे रूपांतर त्या मधामध्ये करतात. काही दिवसांनी संपूर्ण पोळे मधाने भरून जाते तेव्हा मधपाळ पोळ्यामधून तयार झालेला मध बाहेर काढतो. मधमाशी वाचवण्यास अग्रक्रम देणारी ‘बी बास्केट’ ही संस्था मधमाशांना न मारता पोळ्यातून शास्त्रीय पद्धतीने मध काढण्याचे प्रशिक्षण देते व मध काढताना मधाचा काही भाग पोळ्यात मधमाशांसाठी कसा राखून ठेवावा हेदेखील शिकवते. अशाप्रकारे बी बास्केटतर्फे प्रशिक्षण घेतलेले सुशिक्षित मधपाळ निर्माण केले जातात. शिवाय बी बास्केट संस्था कोणतीही प्रक्रिया न केलेला शुद्ध स्वरूपातील नैसर्गिक मध शक्यतो त्याच प्रशिक्षण दिलेल्या मधपाळांकडून विकत घेते, त्या मधाचे शास्त्रशुद्ध परिक्षण करते व सर्व चाचण्या यशस्वीरित्या उत्तीर्ण झाल्यावर तो मध वाजवी किंमतीत जसाच्या तसा बाजारात विकते. मधाचे अंगभूत गुणधर्म जसेच्या तसे राखण्याकरता नैसर्गिक मधावर कोणतीही प्रक्रिया केली जात नाही.
निसर्गात प्रत्येक ऋतुनुसार ज्याप्रकारचा फुलोरा असतो त्या त्या फुलोऱ्याचा मध बी बास्केटकडे विक्रीस उपलब्ध असतो. उदाहरणार्थ, सुर्यफुल, कारवी, जांभूळ, ओवा, शिसम असा एकाच मुख्य फुलोऱ्यापासून मधमाशांनी तयार केलेला मध असू शकतो तर वसंत ऋतूसारख्या काळात अनेक फुलझाडे एकाच वेळी फुललेली असल्यामुळे सर्व फुलोऱ्यांचा मिळून एकत्रित मध असू शकतो.
मधाचे काही काळानंतर स्फटीकीभवन होते. स्फटीकीभवन होणे ही नैसर्गिक क्रिया असून त्यामुळे मधाच्या गुणवत्तेत कोणताही फरक पडत नाही. परदेशात मधाकडे प्रामुख्याने अन्न म्हणून पाहिले जाते तर भारतात मधाची गणना मुख्यत्वे औषध ह्या प्रकारात केली जाते. आयुर्वेदाने मधाचा औषध म्हणून पुरस्कार केलेला असल्यामुळे भारतात वैदिक कालापासून मधाचा वापर औषध म्हणून करण्याची पद्धत प्रचलित आहे.

२) मेण:- कामकरी मधमाशांच्या पोटावरील खंडामधून ‘मेण’ निर्माण होते व त्या मेणापासून पोळे तयार केले जाते. शिवाय मूळ पोळ्यामध्ये षटकोनी आकाराच्या नवीन कोठड्या तयार करणे, अंडी असलेल्या कोठड्यांची तोंडे बंद करणे, गरज पडल्यास पोळ्याची डागडुजी करून दुरुस्ती करणे अशा कामांकरता मधमाशा मेणाचा उपयोग करतात.
मधमाशांनी सोडून दिलेले रिकामे पोळे आढळल्यास मधपाळ ते पोळे गरम पाण्यात उकळतात व त्यातून मेण गाळून काढतात. ह्या मेणाचा उपयोग सौंदर्य प्रसाधने व शोभेच्या वस्तू तयार करण्याकरता आणि काही त्वचारोगांमध्ये केला जातो.

३) पराग:– मधमाशीचे अन्न म्हणजे फुलातील मकरंद व ‘पराग’ होय. कामकरी मधमाशा ह्या त्यांच्या पायावर असलेल्या परागपिशव्यांमधून परागकण साठवतात व पोळ्यांमध्ये आणतात. मग या माशा पिशवीत साठवलेले ते परागकण अंड्यांमधून बाहेर पडलेल्या अळ्यांना खाद्य म्हणून देतात. यातून अळ्यांना आवश्यक ती प्रथिने मिळून त्यांची वाढ होण्यास मदत होते.
मधपाळ मधाबरोबर पोळ्यातील पराग गोळा करतात व ते पौष्टिक अन्न म्हणून खातात किंवा त्याची विक्री करतात. परदेशात पराग वापरून गोळ्या तयार केल्या जातात व औषध म्हणून त्या घेतल्या जातात.

४) रोंगण:- मधमाशा झाडांच्या काही भागातून पाझरणारा चिकट पदार्थ गोळा करून त्यात आपली लाळ व मेण मिसळून ‘रोंगण ( प्रोपोलिस)’ तयार करतात. पोळ्यातील षटकोनी भाग घट्ट चिकटवण्याकरता, शत्रू व मुंग्यांसारख्या कीटकांपासून वसाहतीचे संरक्षण करण्यासाठी मधमाशा हे रोंगण तयार करतात.
सौन्दर्य प्रसाधनांमध्ये व अनेक प्रकारच्या रोगांवर उपाय म्हणून हे रोंगण वापरले जाते.

५) राजान्न:- कामकरी मधमाशांच्या डोक्यामध्ये असलेल्या ग्रंथीमधून पांढरट पदार्थ स्त्रवत असतो त्यास ‘राजान्न’ म्हणतात. पहिले तीन दिवस अळी अवस्थेतील माशांना हे राजान्न दिले जाते.राणी माशीला मात्र तिच्या अळी अवस्थेपासून ते जीवनभर हे राजान्न कामकरी माशा भरवत राहतात. राजान्नामुळे राणी माशीची वाढ चांगली होऊन तिला २ ते ३ वर्ष असे दीर्घायुष्य लाभते. जीवनभर राणी माशी दररोज अंडी घालत असते.
राजान्न हे बाजारात अत्यंत महाग मिळते व त्याचा उपयोग तारुण्य टिकून राहून दीर्घायुष्य लाभण्याकरता केला जातो.

६) विष:- मधमाशांचे ‘विष’ हे मानवास काही त्रासदायक रोगांवर अमृताप्रमाणे वरदान ठरते.
संधीवात, सांधेदुखी व अर्धांगवायु यांसारख्या काही रोगांवर उपाय म्हणून प्रत्यक्ष मधमाशी आणून ती शरीराच्या रोगबाधित भागावर चावविणे हा पारंपारिक इलाज केला जातो.
तसेच वैद्य लोकं मधमाशांच्या नांगीतून बाहेर पडणारे विषाचे थेंब गोळा करून साठवून ठेवतात व हे विष शुद्ध करून त्यापासून इंजेक्शन तयार करतात. रोग्यांना हे इंजेक्शन टोचून त्यांचा रोग बरा केला जातो.

अशाप्रकारे अनेक उपयोगी पदार्थ देऊन मधमाशा अखिल मानवजातीवर उपकार करत असतात. या उपकारांची जाण ठेऊन त्याची परतफेड म्हणून प्रत्येकाने मधमाशी वाचवण्याचा संकल्प केला पाहिजे. शिवाय पोळ्यातील सर्व पदार्थ एकाच वेळी ओरबाडून न घेता त्यातील काही हिस्सा पोळ्यातील मधमाशांकरता ठेवणे आवश्यक आहे कारण त्या सर्व पदार्थांवर खरं तर त्या मधमाशांचाच फक्त मालकीहक्क आहे. मानव हा निसर्गातील एक सर्वांत बुद्धिवान परंतु परावलंबी प्राणी आहे ह्या सत्याचे सतत स्मरण ठेऊन त्याने इतर सजीवांशी सहानुभूतीची वागणूक ठेवल्यास ह्या पृथ्वीचे नंदनवन होण्यास वेळ लागणार नाही.

लेखिका – प्रिया फुलंब्रीकर
सचिव, बी बास्केट सोसायटी

सोबत फोटो: बी बास्केट मध

मुंबई येथील ‘पंचायत भारती’ पाक्षिकात बी बास्केटतर्फे प्रसिद्ध झालेल्या लेखमालेतील लेख क्र.१, २, ३ आणि ४.

Leave your thought