‘शिशिर संपला, वसंत आला…’
थंडीने गारठवणारा शिशिर ऋतु ‘सायोनारा’ (परत भेटेपर्यंत तूर्तास रामराम!) म्हणते वेळी वसंत ऋतुच्या आगमनाची चाहूल लागते अन् मग निसर्गात अद्भुत स्थित्यंतरे घडण्यास सुरुवात होते. शिशिरात निद्रादेवीच्या अधीन गेल्यात की काय असे वाटणाऱ्या अनेक प्रकारच्या वनस्पती वसंताची चाहूल लागताच खडबडून जाग्या होतात जणु एखादा स्वर्गातील दूतच अदृष्य रुपात येऊन मधुर आवाजात आरोळी ठोकून त्या सर्व वनस्पतींना गाढ झोपेतून उठवून मधुमासाची खबर द्यायला या पृथ्वीतलावर अवतरलाय की काय असे वाटावे! त्याची हाळी ऐकून जीवसृष्टीतील अगदी प्रत्येक सजीव मधुमासातील आनंदोत्सवात सामील व्हायला सज्ज होतो.
भारतीय कालगणनेनुसार श्री वसंत पंचमीला या ऋतुराजाचे थाटात ऐटदार आगमन होते तेव्हा माणसांबरोबर सारी सृष्टीच जणु वसंतगान गाऊन हा सृजनसोहळा साजरा करत असताना दिसून येते. हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतातील बसंतीकेदार रागात बांधलेली ‘मधुवा पी बन लागी’ ही मधुमासात मधमाश्या मधुरसाने भरलेले वन अक्षरशः पिऊ लागतात अशा अर्थाची अप्रतिम बंदिश आहे. खरोखर हा
ऋतुराज लोभस कुसुमायुध चारुकांताचे अस्तित्व फुलावर आलेल्या सर्व प्रकारच्या वनस्पतींच्या रूपातून जाणवून देत मधमाश्यांकरिता तसेच परागीभवन करणाऱ्या इतर जीवांकरिता भरभरुन आनंद घेऊन येतो. वसंताची चाहूल लागताच कामकरी मधमाश्या पोळी बांधण्यासाठी नवीन जागेच्या शोधार्थ हिंडू लागतात; तर योग्य जागा शोधून तिथे नव्याने पोळी बांधत असलेल्या मधमाश्या पोळ्यांमध्ये मधाची बेगमी करून ठेवण्यासाठी एकसारख्या षटकोनी आकाराच्या जास्तीच्या कोठड्या बांधू लागतात. मधुमासामध्ये पक्षी जगतात पक्ष्यांच्या रंगरुपात व वर्तनात प्रकर्षाने जाणवतील असे बदल घडून येतात. सुभग, दयाळ, कोकीळ, नाचण असे गोड गळ्याचे पक्षीगण पहाटेपासूनच आपली अद्वितीय गानकला सादर करण्यास सुरुवात करतात. तर बुलबुल, शिंपी, भारद्वाज, पोपट, तांबट, मैना ह्या पक्ष्यांच्या वैशिष्ट्यपूर्ण आवाजातील किलबिलाटामुळे अंगणातील प्रत्येक झाडच रुणझुणत नव्याने जिवंत झाल्यासारखे भासते. वनस्पती विश्वामध्ये तर या ऋतुराज वसंतात अंतर्बाह्य नवचैतन्य संचारलेले ठळकपणे दिसून येते. अगदी काल-परवापर्यंत नगण्य वाटावी अशी कणखर कड्यांच्या कपाऱ्यांतून उगवलेली धायटीची झुडुपे लाल फुलांनी अफलातून बहरून जाणाऱ्या-येणाऱ्या वाटसरूंचे चित्त वेधून घेतात. मकरंदाने पुरेपूर भरलेल्या त्या इवल्याशा लालचुटुक पुष्पपेल्यांवर ताव मारायला फुलचोखे, राखी वटवट्या, चष्मेवाला, शिंजिरासारखे पक्षी आणि भरपूर मधमाश्या व फुलपाखरे यांची एकच झुंबड उडते. मधुरसाने गच्च भरलेल्या धायटीच्या त्या पेल्यांमध्ये अगदी तळाशी असंख्य लाल व काळ्या मुंग्या देखील रसपान करण्यात रममाण झालेल्या दिसून येतात. तर काटेसावर उर्फ शाल्मलीच्या फांद्या गडद गुलाबी रंगाच्या भव्य पुष्पपेल्यांनी भरून गेलेल्या दिसून येतात. त्या पेल्यांमधील विपुल मकरंद सेवन करायला नीळकंठ, पोपट, वेडा राघू, बुलबुल, कोतवाल, ग्रीन बार्बेट, शिंजिर, हळद्या असे अगणित पक्षीगण हजेरी लावतात. पक्ष्यांच्या या भाऊगर्दीत चपळ खारुताई पण तुरुतुरु चालत त्या पेल्यांवर ताव मारायला येताना दिसते. याशिवाय शाल्मलीच्या या मनमोहक सुमनांवर भरपूर प्रमाणात मधमाश्या येतात व लगबगीने त्या मधुर पेल्यांमधील मकरंद आणि पराग गोळा करू लागतात. तर Chestnut-streaked sailer आणि Common sailor ही फुलपाखरे शाल्मलीच्या या फुलांवर मधुरसासाठी तर येतातच शिवाय त्यांचे संपूर्ण जीवनचक्रच या वृक्षावर ते व्यतीत करतात. अशी ही नखशिखान्त नटलेली शाल्मली वसंतातल्या या रंगोत्सवात पुरती समरसून गेलेली दिसून येते. याच सुमारास शहरांतील रस्त्यांवर चालताना अचानक पायाखाली खाकी रंगाच्या पातळ पापड्या येतात व मान वळवून बघावे तर शेजारीच रस्त्याकडेला त्या पक्व पापड्यांचे ढिगच्या ढिग दिसून येतात. रस्त्याकाठी लागवड केलेल्या वावळच्या त्या गतवर्षीच्या पापड्या असून वर डोके करत वावळ वृक्षाकडे पाहिल्यास काही पक्व पापड्या वाऱ्याच्या झुळुकीसरशी हलकेच घरंगळत खाली गळून पडत असताना दिसून येतात. वावळ वृक्षाकडे बारकाईने निरखून बघितल्यावर त्याच्या काही फांद्या चटकन डोळ्यांना दिसू न येईल अशा बारीक फुलांनी तर काही फांद्या नवीन तजेलदार पोपटी पापड्यांनी भरलेल्या दिसून येतात. अनेकदा रस्त्यांच्या कडेलाच क्रेप कागदासारख्या पाकळ्यांच्या गुलाबी फुलांनी मढलेली झाडे दिसून येतात. ती झाडे महाराष्ट्राचे राज्यपुष्प असलेल्या ताम्हण वृक्षाची असून त्या गुलाबी फुलांवर प्रचंड प्रमाणात मधमाश्या आलेल्या दिसून येतात. रस्त्याच्या बाजूला लावलेला बहावा पिवळ्या धमक झुंबरांनी सजलेला दिसतो. या बहाव्याचे ते सुंदर सोनेरी पुष्पवैभव न्याहाळताना अवर्णनीय आनंद लाभतो. तसेच कृष्णलीलेशी थेट नातं जोडलेला सदाहरित कदंबदेखील रस्त्याकाठी भेटू शकतो. त्याला फुले मात्र पावसाळ्यात येत असली तरी तो त्याच्या दाट पर्णसंभारामुळे लक्ष वेधून घेतो.
शाल्मलीच्या मधुपेल्यावर ताव मारत असताना शिंजिर. (फोटो सौजन्य: श्री.पराग साळसकर)
या तर भगव्या अग्नि ज्योतीच! वसंतात पूर्ण बहरलेला पळस. (फोटो सौजन्य: श्रीमती वीणा भालेराव)
वसंतात पूर्ण बहरलेले महाराष्ट्राचे राज्यपुष्प ताम्हण!
शहरातील नदीकाठच्या बऱ्याच वनस्पतीदेखील या काळात फुलांवर येतात. नदीच्या तीरावरील वटवृक्ष कच्च्या फळांनी (खरं म्हणजे प्राथमिक अवस्थेतील ती कच्ची फळे म्हणजे त्याची फुलेच) लगडतो व थोड्याच अवधीत ती पक्व होऊन त्यांचे लाल रंगातल्या फळांत रूपांतर होते. नदीतीरावरील पुराण्या जांभूळ वृक्षावर भलेमोठे मोहोळ केलेल्या आग्या मधमाश्या त्या जांभळावर फुले कधी येतील याच्या प्रतिक्षेत असतात. नदीकाठच्या आम्रवृक्षावर मात्र मोहोर धरलेला असतो अन् त्याच्या तीव्र सुगंधाने असंख्य लहान-मोठ्या माश्या त्यावर घोंघावत असलेल्या दिसून येतात.
वडाची पक्व फळे म्हणजे फळझाडांचे जीवलग असलेल्या पक्ष्यांची आवडती मेजवानीच!
शहरातील टेकड्यांसारख्या ठिकाणी गणेरची झाडे सोनेरी रंगाच्या देखण्या फुलांनी बहरून आलेली दिसून येतात. ती सोनसळी फुले पाहून गणेरचे सोनसावर हे नाव त्या वृक्षास अगदी शोभून दिसते. या सोनसावरींवर गतवर्षाची पक्व झालेली फळे पूर्ण उघडून त्यातील बिया इतस्ततः विखुरण्याची वाट पाहत असल्यासारखी वाटतात. त्याच टेकड्यांवर सुवासिक फुलांनी बहरलेला पाचुंदा भेटतो तसेच उभा उंच वाढलेला वारस वृक्ष फिकट गुलाबीसर रंगाच्या मोठ्या आकाराच्या सुवासिक फुलांनी बहरलेला दिसतो. याच काळात या वारसशी साधर्म्य दर्शवणारी फुले असलेला मेढशिंगी जणु अंगभर चांदण्यांचे आभाळ पांघरले आहे की काय वाटावे असा पांढऱ्या शुभ्र सुवासिक फुलांनी भरून गेलेला दिसतो. टेकडीवर किंवा रस्त्याकाठीदेखील तेजस्वी भगव्या ज्योतीसारखा पुष्पसंभार लेवून उभा असलेला पळस भेटतो. त्यावर फुलांच्या मधूनच आधीच्या पक्व झालेल्या पळसपापड्या डोकावताना दिसतात. लालभडक फुलांचा पांगारादेखील वसंतात पूर्णपणे बहरून येतो इतका की ते झाडच लाल रंगाचे वाटते. तसेच चारोळी आणि अर्जुन हे वृक्षदेखील याच सुमारास फुलतात. टेकडीवरच्या कुसुंब वृक्षावर याच ऋतुत अतिशय सुंदर अशी तांबूस कुसुंबी रंगाची नवपालवी येते. अशा वृक्षवैभवाने समृद्ध झालेल्या टेकड्या वसंतात पुरत्या रंगीबेरंगी झालेल्या दिसून येतात. त्या टेकड्यांवर रानवांगे, करवंद, भेंड अशा अनेक रानटी वनस्पतीदेखील फुललेल्या दिसून येतात.
ही कुसुंबी रंगाची नवपालवी म्हणजे नेत्रसुखद नजराणाच!
सध्याच्या कोव्हिडच्या असुरक्षित वातावरणात घराबाहेर पडून मोकळेपणी निसर्गाचा रसास्वाद घेणे शक्य नाही तर अशा वेळी निदान आपल्या घरातल्या अंगणातील किंवा गच्चीवरील बागेत जाऊन तेथील निसर्गवैभवाचा आपल्याला मनसोक्त आस्वाद घेता येऊ शकतो. या निसर्गसखा वसंत ऋतुत बागेतल्या लिलीच्या कांद्यांना धुमारे फुटून अल्पावधीत त्या फुलावर येतात. पेरूच्या झाडावर सुंदर पांढरी फुले फुललेली दिसून येतात. त्या फुलांवर मधुरसपान करण्यात अगदी मंत्रमुग्ध झालेल्या मधमाश्या दिसून येतात. कमानीवरील पेट्रियाचा वेल निळया भिंगऱ्यांनी पूर्णपणे बहरतो. तसेच जाई-जुईला नाजूक फुले येऊ लागतात. बागेतील देशी गुलाब, अनंत, मोगरा, मदनबाण, कुंद हे पण भरभरून फुलू लागतात व दरवळीने आसमंत व्यापून टाकतात. तर दारचा सोनचाफा फुलावर येऊन त्याचा अत्तरासारखा घमघमाट अगदी चौफेर पसरवतो. अंगणातील लाल व पांढरा चाफादेखील निष्पर्ण होऊन डेरेदार झुबक्यांनी भरून गेलेला दिसतो.
बागेतील पेरूच्या फुलांवर आलेल्या मधमाश्या.
(फोटो सौजन्य: ऋता भागवत)
वसंतात सर्वदूर सुगंध नेणारा हा बागेतील मोगरा! (फोटो सौजन्य: नीला पंचपोर)
अशी ही शहरांमधील निसर्गातील बहारदार रंगपंचमी! वसंत ऋतुत निसर्ग मुक्तहस्ताने ही जी जादुई रंगांची उधळण करत असतो त्याचे कितीही वर्णन करावे तितके अपुरेच!
लेखिका : प्रिया फुलंब्रीकर
संस्थापक, ग्रीन बर्ड्स अभियान
टीम बी बास्केट सदस्य