हळूहळू अमित मोठा होत होता. शाळेत असताना त्याला गणित विषय आवडायला लागला होता; मात्र पुढची दिशा ठाऊक नव्हती. दहावीत असताना चांगले गुण मिळाले. मग आई-वडिलांनी त्याला ‘तू इंजिनीअर हो’ असं सांगितलं. अमितनं इंजिनीअरिंगला प्रवेश घेतला आणि तो मेकॅनिकल इंजिनीअर झाला. पहिलीच नोकरी मुंबईसारख्या महानगरीत आणि सॉफ्टवेअर क्षेत्रात मिळाली. पाच वर्षं अमितनं ही नोकरी इमानेइतबारे केली; मात्र त्याला मुंबई आवडायची नाही. आपण कुठून या काँक्रीटच्या जंगलात आलो, असं वाटून त्याला मग रायपूरचं जंगल आठवायचं. आपल्या टेबलवरून त्याला आपल्या बॉसची केबिन दिसायची. काही वर्षांनी आपणही बढती मिळून त्या केबिनमध्ये बंदिस्त जागेत बसलेलो असू, असे विचार मनात येताच तो अस्वस्थ व्हायचा.
त्याचदरम्यान अण्णा हजारे यांच्या नेतृत्वाखाली देशभर भ्रष्टाचारविरोधी चळवळ सुरू झाली होती. निषेध, मोर्चे, घोषणा या सगळ्यांत अमितनंही भाग घेतला. त्या वेळी त्याला ७०-७५ वर्षं वयाची अनेक माणसंही भेटली. त्यांच्याशी बोलताना त्याला कळलं, की यातल्या प्रत्येकाला आयुष्यात वेगळंच काहीतरी करायचं होतं; पण ते राहूनच गेलं आणि ती खंत उराशी घेऊन ते जगत होते… अमितच्या मनात त्या वेळी विचार आला, की आपण राजकारणात जाऊ शकतो का? त्याचं उत्तर मनानं ‘नाही’ असं दिलं. मग त्यानं मनाला दुसरा प्रश्न विचारला, ‘आपण आहे ती नोकरी आयुष्याच्या अखेरपर्यंत करू शकतो का?’ त्याचंही उत्तर ‘नाही’ असंच येत होतं; पण करायचं काय हे मात्र काही केल्या कळत नव्हतं.
मुंबईतली गर्दी, जागांचे आकाशाला भिडलेले भाव हे सगळं बघून अमितनं पुण्यात वारजे या भागात एक ब्लॉक विकत घेतला. शनिवार, रविवारी तो मुंबईहून पुण्यात येऊ लागला. एकदा सुट्टीच्या दिवशी असाच तो आला असताना त्यानं बघितलं, की त्याच्या सोसायटीत मधमाश्यांचं पोळं लागलेलं होतं आणि आपल्या मुलांना या मधमाश्या चावतील या भीतीनं लोकांनी ‘पेस्ट कंट्रोल’वाल्यांना बोलावलं होतं. ‘पेस्ट कंट्रोल’च्या लोकांनी येऊन तिथे फवारणी केली आणि बघता बघता मृत मधमाश्यांचा सडा खाली पडला. त्या मधमाश्यांकडे पाहून अमितचा जीव कळवळला. त्याला इवल्याश्या बाटल्यांतला मध विकत घेणारे लोक दिसायला लागले. लोकांना मध हवा आहे, पण मधमाश्या नको आहेत, या विचारांनी त्याला अस्वस्थ वाटायला लागलं. कोणीतरी या मधमाश्यांना वाचवायला हवं. आज आपल्या सोसायटीत घडलंय, उद्या आणखी कुठेही हे घडणार, घडतही असेल…. हे सगळे बेचैन करणारे विचारच अमितला पुढल्या आयुष्याचं वळण दाखवणार होते.
Excellent work want to part of it and your guidance i have land near lavasa pl guide 9890366413
[email protected]