My Cart
0.00

मधमाशांची सद्यस्थिती व उपाय

१९ ऑगस्ट २०१७ हा ‘जागतिक मधमाशी दिन’ म्हणून घोषित केलेला दिवस! या मधमाशी दिनाचे औचित्य साधून भारतातील मधमाशांची आजची सत्य परिस्थिती काय आहे याविषयी जाणून घेऊया.

गेल्या लेखात मधमाशांची परागसिंचनातील महत्वाची भूमिका आपण पाहिली; तसेच मधमाशीजन्य उपयुक्त पदार्थांची माहितीदेखील आपण घेतली. यावरून मधमाशी हा निसर्गातील महत्वाचा कीटक आहे आणि ह्या छोट्याशा कीटकाचे पृथ्वीवरील अस्तित्व टिकवणे हे अखिल मानवजातीच्या कल्याणाचे आहे याचा बोध आपण घेतला. मग आज मधमाशीविषयक जाणीवजागृती करण्याची गरज का बरं भासत आहे? याचे ऐकमेव कारण म्हणजे मधमाशीबद्दल समाजात अजूनही अज्ञान व अनेक गैरसमज आहेत. त्यामुळे सध्याच्या काळात मधमाशांची परिस्थिती अतिशय बिकट म्हणावी अशी झालेली आहे. आज मधमाशा कोणत्या भीषण परिस्थितीतून जात आहेत हे आपण बघूया:-
१) मधमाशांबद्दल समाजात असलेले अज्ञान व गैरसमजुतीमधून निर्माण झालेली भीती ह्यामुळे शहरात आणि गावात कुठे मधमाशांचे पोळे दिसले की ते पोळे एक तर जाळले जाते किंवा त्या पोळ्यावर पेस्ट कंट्रोलचा घातक उपाय करून ते नष्ट तरी केले जाते.

२) भारतात अजूनही तग धरून राहिलेल्या काही जंगलांमध्ये मोठ्या प्रमाणात पोळी सापडतात. परंतु निसर्गाचे उत्तम ज्ञान असले तरीही तेथील आदिवासी ती पोळी पिळून काढून त्यातून मध बाहेर काढतात. यामुळे पोळ्यातील माशा, पिल्ले व अंडी मरण पावतात. अशा अशास्त्रीय पद्धतीमुळे मधमाशांच्या वसाहती नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत.

३) वाढत्या शहरीकरणामुळे सर्वत्र प्रचंड प्रमाणात वृक्षतोड होत आहे. यामुळे मोठमोठ्या अस्सल देशी झाडांवर पोळे करून राहणाऱ्या दगडी उर्फ आग्या मधमाशांचा अधिवासच लोप पावत चाललाय. त्यामुळे ह्या माशा सिमेंटच्या जंगलात उंच इमारतींवर पोळे करू लागल्या आहेत. मग इमारतींमधील लोकांना पोळ्यातील मधमाशा आपल्यावर हल्ला करतील की काय अशी भीती वाटू लागते आणि शेवटी त्यांच्याकडून पोळ्यातील मधमाशांसहित संपूर्ण पोळे नष्ट केले जाते.

४) दिवसेंदिवस शेतांमध्ये अधिकाधिक तीव्र स्वरूपाची रासायनिक खते, कीटकनाशके आणि तणनाशके यांचा भरपूर वापर होत आहे. याचा पिकांवर व मधमाशांसारख्या परागसिंचनास सहाय्यकारी ठरणाऱ्या मित्र कीटकांवर विपरीत परिणाम होत आहे.

५) भारतात मधमाशीपालन व्यवसायाबद्दल बहुसंख्य शेतकरी, कृषीतज्ञ यांची अनास्था. परिणामी दुर्लक्षित व्यवसाय म्हणून लाभदायी सरकारी योजनांबद्दल अज्ञान. अशाप्रकारे भारत ह्या कृषीप्रधान देशाची एकूण लोकसंख्या लक्षात घेता शास्त्रीय पद्धतीने मधमाशा वाचवून केलेले मधमशीपालन म्हणावे तितके प्रचलित झालेले नसल्यामुळे मधमाशी वाचवणे गरजेचे आहे या संकल्पनेने अजून मूळ धरलेले नाही.

आपण मधमाशांच्या सद्यस्थितीविषयी माहिती घेतली आता यावर उपाय आपल्यालाच करायचा आहे. बहुगुणी मधमाशा वाचवण्याकरता आपण पुढील सकारात्मक गोष्टींचा अवलंब करू शकतो:-
१) घराच्या गच्चीवरील बागेत, गृहरचना संस्थेच्या आवारात किंवा घराच्या अंगणातील परसबागेत मधमाशांना प्रिय असलेली फुलझाडे जास्तीत जास्त प्रमाणात लावणे. यामुळे मधमाशांना फुलांमधील मकरंद व पराग हे खाद्य सहजी उपलब्ध होईल.

२) आपण राहतो ते गाव किंवा शहर यामधील रस्त्यांच्या कडेला तसेच टेकड्यांवर मधमाशांना खाद्य व वास्तव्य पुरवणाऱ्या योग्य देशी वृक्षांची लागवड करणे.

३) सध्या शहरातील व गावातील पाणवठे कमी झाले आहेत. त्यामुळे उन्हाळ्यात घरातील गच्चीवर किंवा घरातील अंगणात मधमाशांकरता पाणी ठेवणे. कामकरी माशा ह्या पाण्याचा उपयोग हवेतील उष्णतेचा पोळ्यातील राणी माशी व इतर मधमाशांना त्रास होऊ नये म्हणून पोळ्यावर शिंपडण्यासाठी करतात.

४) शेतकऱ्यांनी सेंद्रिय शेती किंवा नैसर्गिक शेती अशा विषरहित शेतीतंत्राचा वापर करणे. अशी रसायनविरहित शेतीपद्धती मधमाशी वाचवण्यासाठी
तसेच मानवाच्या आरोग्यासदेखील कल्याणकारी आहे.

५) शेतकरी, गिरीजन, आदिवासी, हौशी मधपाळ यांनी मधमाशा न मारता शास्त्रीय पद्धतीने मध काढण्याचे तंत्र शिकून घेऊन त्याचा वापर करणे.

६) अंगणातील किंवा गच्चीवरील बागेत मधमाशांनी पोळे केले असेल तर तुमच्या बागेसाठी ही नक्कीच उपयोगी बाब आहे. अशा वेळी घाबरून न जाता मधमाशा घरात येऊ नयेत म्हणून तुम्ही दारे-खिडक्यांना बारीक जाळी बसवू शकता.

मेणकिडा, वेडा राघू असे काही सजीव हे मधमाशांचे भक्षक असून अस्वलापासून तर संपूर्ण पोळ्यास धोका असतो. ‘जीवो जीवस्य जीवनम्’ या निसर्ग नियमानुसार हे झाले मधमाशांचे नैसर्गिक भक्षक. परंतु आज सर्वत्र असे दिसून येते की विकसीत मेंदू लाभलेला, निसर्गातील सर्वांत बुद्धिवान असणारा माणूस हा प्राणी स्वतःच्या स्वार्थासाठी निसर्गातील अनेक घटकांचा दुरुपगोग करत असून निसर्गाचा ऱ्हास होण्यास कारणीभूत ठरत आहे. अधिक विकासाच्या हव्यासापोटी मधमाशीसारख्या उपयुक्त कीटकांचा नाश होण्यास मानवच जबाबदार आहे. मधमाशांचा नैसर्गिक अधिवासच नष्ट करणे, बाजारात मोठ्या प्रमाणात विक्रीसाठी उपलब्ध करून दिलेल्या मधात बेमालूम भेसळ करणे, प्रदूषणाचा भस्मासूर वाढत चालला तरी त्याकडे सोयीस्कररित्या दुर्लक्ष करणे अशा प्रकारे आजच्या प्रगत म्हणवून घेणाऱ्या मानवाने बुद्धीचा सर्रास दुरुपयोग आरंभला आहे. मानवाने आपल्या बुद्धीचा सदुपयोग केल्यास निसर्गाचा होणारा ऱ्हास कितीतरी पटीने कमी करता येईल. माणसाने विवेकबुद्धी तेवती ठेवल्यास मधमाशांकडून अनेक उत्तम गुण आत्मसात करून घेणे त्यास सहजशक्य आहे. आपापल्या पोळ्यात आदर्श सामुदायिक जीवन जगणाऱ्या मधमाशा हे ‘समूहप्रिय कीटक’ म्हणजे ‘एकी हेच बळ’ या उक्तीचे मूर्तीमंत प्रतीक होय. आज समाजातील सर्व लोकांनी एकत्र येऊन मित्र कीटक असणाऱ्या मधमाशांना वाचवणे अत्यंत आवश्यक आहे. हेच मानवाच्या स्वतःच्या हिताचे असून निसर्गातील जैवविविधता टिकविण्यास व निसर्गाचा बिघडलेला समतोल राखण्यास सहाय्यकारी ठरणारे आहे.

श्री समर्थ रामदासस्वामींनी म्हटले आहेच,
‘एकमेका साह्य करू,
अवघे धरू सुपंथ’

आजच्या जागतिक मधमाशी दिनाच्या सुमुहूर्तावर
बहुगुणी मधमाशांना वाचवण्याकरता सारे मिळून ह्या सुपंथाची वाट पकडू या !

लेखिका:- प्रिया फुलंब्रीकर
मो.क्र.:- ९७६६६२३४०९
सचिव, बी बास्केट सोसायटी

मुंबई येथील ‘पंचायत भारती’ पाक्षिकात बी बास्केटतर्फे प्रसिद्ध झालेल्या लेखमालेतील लेख क्र.१, २, ३ आणि ४.

Leave your thought