My Cart
0.00
Blog

‘मधमाशांची गरज : शुद्ध पाणी आणि पर्यावरण’

 ‘मधमाशांची गरज : शुद्ध पाणी आणि पर्यावरण’
    आपण नदीच्या उगमस्थानाजवळील जंगलसदृश भाग अथवा कोणत्याही लहान-मोठ्या नैसर्गिक पाणवठ्याच्या स्रोताकडील प्रदेश बारकाईने न्याहाळला तर अनेकदा त्या परिसरात किंवा नजीकच्या भागात मोठ्या झाडांवर, डोंगराच्या कपारीत मधमाशांचे एखादे तरी भले मोठे पोळे किंवा त्यांच्या अनेक वसाहती आपल्याला आढळून येतात.
      मग असा प्रश्न पडतो की अशा ठिकाणी मधमाशा हमखास कशा काय दिसतात? याचे उत्तर सोपे आहे. मधमाशी हा अतिशय संवेदनशील कीटक असल्यामुळे मधमाशांना शुद्ध पाणी, प्रदूषणमुक्त हवा, रसायनविरहित जमीन, विपुल फुले येणारी झाडे-झुडुपे-वेली-महालता-क्षुपे असलेला परिसर वास्तव्याकरता पूरक ठरतो. जिथे शुद्ध नैसर्गिक पाणवठा तिथे झाडे-झुडपे येऊन रान तयार होते. त्या घनदाट वनराजीमधील सर्वांत उंच अशा जांभूळ, पिंपळ यांसारख्या अस्सल देशी झाडांची निवड आग्या माशा वसाहती करता करतात. तर जवळपासच्या डोंगर उतारांवरील कड्यांच्या कपारीत सातेरी माशा पोळी करून राहतात. तसेच आकाराने लहान असलेल्या फुलोरी माशा देखील तेथील कोणत्यातरी फुलझाडांच्या फांद्यांवर पोळे करून रहात असलेल्या दिसून येतात.
     ह्या मधमाशांना अशा मानवी हस्तक्षेप अतिशय कमी प्रमाणात असलेल्या किंवा अजिबातच नसलेल्या प्रदेशात शांततेने राहता येते. तिथे त्यांना अनेकविध फुलांमधील मकरंद व परागकण अन्न म्हणून मिळते. विषारी रसायने नसल्यामुळे आसमंतात एक प्रकारचे तेजस्वी चैतन्य पसरलेले असते. या मधमाशांमार्फत सुदृढ परागीकरणाची सेवा घडत असते त्यामुळे झाडांवर उत्तम प्रतीची फळे धरून जिकडेतिकडे समृद्धी नांदत असते. मूळ पाण्याचा दर्जा उत्कृष्ट असल्यामुळे सर्व परिसरात जैवविविधता वाढलेली दिसून येते. या सर्व गोष्टींमुळे नैसर्गिक परिसंस्था सक्षम झालेली असते. त्या शुद्ध पाणवठ्यातील पाण्याचा उपयोग कामकरी मधमाशा मुख्यतः उन्हाळ्यात पोळ्याचे तापमान नियंत्रित ठेवण्याकरता करतात. या माशा पाणवठ्यावर जाऊन पाणी तोंडात धरून आपल्या पोळ्याकडे परत येतात व त्या पाण्याची फवारणी पोळ्यावर करून पोळ्यातील उष्णता कमी करतात. त्यामुळे पोळ्यातील राणीमाशी, लहान पिल्ले व अंडी हे उष्माघाताने होरपळून जाण्यापासून वाचतात.
वरील सर्व कारणांमुळे मधमाशा शुद्ध पाण्याच्या स्रोताजवळ वसाहती करून राहणे पसंत करतात.
    आज मात्र नद्यांच्या उगमस्थानाजवळील बहुतांश परिसर माणसाने वस्ती करून, रसायनयुक्त शेती करून विटाळायला सुरुवात केलेली आहे असेच सर्वत्र चित्र दिसत आहे. रस्ते करण्याकरता, उंचावर हॉटेल-रिसॉर्ट बांधण्याकरता, शेती करण्याकरता अवाजवी डोंगरफोड आरंभली आहे. ह्या सर्व प्रकारांमुळे मधमाशांचा अधिवास धोक्यात आलेला आहे. यामुळे या मधमाशा फिरत फिरत शेवटी मानवी वस्तीत येऊन राहायला लागल्या आहेत. मधमाशांबद्दल समाजात अनेक गैरसमज प्रचलित असल्यामुळे मधमाशा मानवी वस्तीत येऊन पोळे करत असलेले दिसताच ते पोळे लगेच जाळून टाकून किंवा त्यावर पेस्ट कंट्रोलसारखा घातक उपाय करून मधमाशांना मारून टाकण्याकडे सर्वांचा कल दिसतो. अशा प्रकारे मधमाशा नष्ट करणे म्हणजे आपणच आपल्या हाताने आपले नुकसान करून घेणे होय. मधमाशी हा मित्र कीटक वाचवण्यासाठी सर्वप्रथम नदी-नाले-ओढे असे नैसर्गिक जलस्रोत व त्या भोवतीची जंगले वाचवणे महत्वाचे आहे. ही गोष्ट लक्षात घेऊन त्या दृष्टीने आताच पावले उचलण्यास सुरुवात करणे अत्यावश्यक आहे.
    मधमाशांचे इथे वानगीदाखल उदाहरण दिले आहे पण खरं म्हणजे असे शुद्ध वातावरण सर्व प्राणी, पक्षी व वनस्पतींना अनुकूल असते. अगदी माणूसदेखील निसर्गातीलच एक घटक असल्यामुळे तो पण यास अपवाद नाही. पण आज मानव हा निसर्गातील अनेक घटकांसारखा एक घटक आहे हीच बाब आपण अति विकासाच्या हव्यासापोटी सोयीस्कररित्या विसरून गेलेलो आहोत. अलिकडे हवा-पाणी-जमीन अशा सर्व ठिकाणी प्रदूषणाने राक्षसी विळखा घातलेला दिसून येतो. यातील बहुतांश प्रदूषण हे मानवनिर्मित असल्यामुळे त्यातून मुक्तता करून घेण्याचा उपायपण आपल्याच हातात आहे. सगळ्यांनी प्रदूषण मुक्तीच्या मार्गावर वाटचाल सुरू केल्यास संपूर्ण भारतभूमी पुन्हा ‘सुजलाम् सुफलाम्’ होऊन तिला गतवैभव प्राप्त होईल यात काही शंकाच नाही.
लेखिका:- प्रिया फुलंब्रीकर
मो.क्र.:-    ९७६६६२३४०९
(सचिव, बी बास्केट सोसायटी)
Article published in ‘Angholichi goli’, first digital Diwali magazine of Maharashtra

Leave your thought