My Cart
0.00

निसर्ग एक अद्भुत गुंफण!

वैशाख वणव्याने अगदी होरपळून गेलेला चराचर सृष्टीतील प्रत्येक जीव ज्याची आतुरतेने वाट पाहत असतो तो एकदाचा येतो…येतो म्हणण्यापेक्षा अवचित बरसतो आणि तृषार्त भूमीतील कणाकणास तृप्त करून टाकतो. पश्चिम घाटांमधील उघड्याबोडक्या डोंगरांवर असंख्य जलप्रपात निर्माण होतात व ते अवखळपणे कड्यांवरून कोसळू लागतात. ऋतू जसजसा आषाढाकडे मार्गक्रमण करत जातो तसे बघता-बघता त्या जलप्रपातांचे भव्य धबधब्यात रूपांतर होते. कोसळणाऱ्या धबधब्यांचे मनोहर रूप व ध्वनी सृष्टीतील चैतन्यात आगळी रंगत आणतात.  डोंगरमाथे जणू मऊ दुलई पांघरल्यासारखे ढगांमध्ये डुब बुडून जातात. हवेत एक प्रकारचा तजेला, गारवा व प्रसन्नता भरलेली जाणवते.

 

    त्या बोडक्या डोंगरांवर व कड्यांच्या कपारींमध्ये असंख्य प्रकारच्या गवतांच्या, लता-वेलींच्या, क्षुपांच्या बिया गाढ झोप लागलेल्या बालकांप्रमाणे निद्रिस्त अवस्थेत पहुडलेल्या असतात. सुरुवातीच्या रिमझिमणाऱ्या पावसाचे थेंब टपकन अंगावर  पडताच त्या खडबडून जाग्या होतात व अंकुरायला लागतात. गवताच्या बियांमधून अनेकविध चिवट गवते उगवतात. वेलींच्या बियांमधून खडकांस घट्ट विळखा घालणाऱ्या लता अवतरतात. क्षुपांच्या बियांमधून चवेणीसारखी कणखर, वर्षाराणीसारखी नखरेल तर माईनमुळ्यासारखी औषधी क्षुपे उगवतात. पाऊस दाट पडून गेल्यावर तर रमणीय पुष्पसोहळ्यास सुरुवात होते. गवतांच्या हिरव्यागार गालिच्यावर गवतफुले डोलताना दिसतात. त्यांवर मधूनच सोनकीच्या नाजूक सोनेरी फुलांची नक्षी उठून दिसायला लागते. अग्निशिखा, कुसर, वाकेरी, गणेश अशा लता-वेली मोहक फुलांनी फुलून गेलेल्या दिसू लागतात. चवेणीच्या लांबट पोपटी पानांत दडलेल्या केळफुलांची तोंडे दिसू लागतात.  नावे तरी किती घ्यायची… अगदी असंख्य रानफुले वाऱ्याच्या झोक्यावर मजेत झुलताना दिसतात. अशा बहरलेल्या वनस्पतींवर डोंगरांमधील गुहांत व कपाऱ्यांत दडलेल्या पोळ्यांमधील मधमाश्यांची झुंबड उडालेली दिसून येते. मधमाश्यांना फुलांमधील मकरंद व पराग भारी प्रिय असल्यामुळे त्या या पुष्पपेल्यांवर ताव मारण्यात अगदी धुंद झालेल्या दिसून येतात. कामकरी माश्या हा मेवा स्वतः खाऊन जास्तीतजास्त पोळ्यात साठवत रहातात व अशा प्रकारे गोठवून टाकणाऱ्या हिवाळ्यामध्ये खाण्यासाठी सर्वांकरता आधीच अन्नाची तरतूद करून ठेवतात. मधमाश्यांबरोबरच चित्रविचित्र पोशाखातील फुलपाखरे व लहान-मोठे पक्षीगण ह्या फुलांवर मधुरस पिण्यास आलेले आढळतात.

 

 

गवतावर पराग घ्यायला बसलेल्या मधमाश्या (फोटो अभिजित गांधी)

पावसाळ्यात निर्माण होऊन कड्यावरून खाली कोसळणारा धबधबा (फोटो प्रिया फुलंब्रीकर)

    हे निसर्गाचे वैभव टिकवण्यासाठी निसर्गप्रेमींनी डोंगरदऱ्यात भ्रमंती करते वेळी आपल्याकडून कोणत्याही स्वरूपाचे प्रदूषण होऊ नये म्हणून काळजी घेणे आवश्यक आहे. याकरता हुल्लडबाजी करत निसर्गाची विटंबना करू नये. घातक व अविघटनशील कचरा वाट्टेल तिथे फेकू नये. तसेच सर्वांत महत्वाचे काय असेल तर माणसांनी स्वार्थासाठी गुपचूप वा उघडपणे सर्वत्र सुरू केलेली डोंगरफोड थांबवणे. कारण हा अधिवास जितका पक्षी, पतंग, फुलपाखरे, मधमाश्यांसारख्या परागण करणाऱ्या जीवांकरता गरजेचा आहे तितकाच हा तुमच्या-आमच्याकरता महत्वाचा आहे. डोंगरांच्या अस्तित्वावरच गदा आली तर हे पावसाळी जलप्रपात,  नद्या-नाले यांच्या उगमावरच घाव घातला जाईल. मग जीवनच नाही तर त्यावर आधारीत जीवसृष्टीचादेखील हळूहळू ऱ्हास होईल.

 

 
कौंडल या रानवेलाचे फुल(फोटो प्रिया फुलंब्रीकर)

 

   पर्यावरणशास्त्राचे मुलभूत तत्व हे स्पष्ट करते की निसर्गातील सगळे सजीव व निर्जीव घटक परस्परांवर अवलंबून असतात. मग पर्यावरणीय साखळीतील ही सुंदर गुंफण लक्षात घेता निसर्गातील जीवविविधता राखणे हे प्रत्येकाचेच कर्तव्य आहे.

 

काय पटतंय ना तुम्हाला?

 

चला तर मग ह्या वर्षा ऋतूत निसर्ग जपत सजग भटकंती करू या!

 

प्रिया फुलंब्रीकर
  (टीम बी बास्केट)

One thought on “निसर्ग एक अद्भुत गुंफण!

  1. फारच सुंदर.मी पुढील प्रपोजल करीता फोन करणार आहे.

Leave your thought